सोलापूर : एमआयएमचे शहराध्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगाची हवा खात असताना आता वंचीत आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नोकरी लावतो म्हणून सुशिक्षित तरुणाकडून 2 लाख 65 हजार उकळल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल माशाळकर यांच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
बहुजन वंचीत आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल मशाळकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील किरण भारत चव्हाण या तरुणाला अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात क्लार्क आणि शिपाई पदासाठी जागा निघाल्याचे सांगितले. विद्यापीठातील कुलसचिव सोनजे हे माझ्या परिचयाचे आहेत. तुम्हाला येथे नोकरी लावतो. येथे क्लार्क जागेसाठी 5 लाख रुपयांचा दर सुरू आहे.तुम्हाला यातील अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील असे त्यांनी किरणला सांगितले. यावर विश्वास ठेवून फिर्यादी किरण चव्हाणने त्यांना 2 लाख 65 हजारची रक्कम दिली. पण विद्यापीठाच्यानावे बोगस नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार नंतर समोर आला.
धम्मपाल रेवन माशाळकरांना न्यू बुधवार पेठ येथून पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 417 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.