हिंदुत्ववाद्यांचे सरकार असूनही... हायकोर्टाचा आदेश डावलून पुरातन मंदिर केले जमीनदोस्त

Solapur News : सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गाच्यामध्ये हे मंदिर येत असल्याने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर रातोरात पाडले आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडावरती आकडेवारी टाकून हे मंदिर जतन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते

Updated: Mar 5, 2023, 04:49 PM IST
हिंदुत्ववाद्यांचे सरकार असूनही... हायकोर्टाचा आदेश डावलून पुरातन मंदिर केले जमीनदोस्त title=

अभिषेक अड्डेपा, झी मीडिया, सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) मोहोळमध्ये जगदंबा देवीचे पुरातन मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी हे मंदिर जमीनदोस्त केल्याने पोखरापूरचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. हिंदुत्ववाद्यांचे सरकार असून अफजलखानाच्या वृत्तीच्या ठेकेदारांनी आमच्या जगदंबा मातेचे मंदिर पाडलं आहे अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर-पंढरपूर पालखी मार्गाच्यामध्ये हे मंदिर येत असल्याने नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर रातोरात पाडले आहे. मंदिराच्या प्रत्येक दगडावरती आकडेवारी टाकून हे मंदिर जतन करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मात्र नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मंदिरातील दगडावर कोणत्याही प्रकारचे आकडेवारी न टाकता रातोरात मंदिर जमीनदोस्त केले आहे.

मंदिर जमीनदोस्त केले असले तरी देवीची मूर्ती हटवण्यात मात्र नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना अपयश आले आहे. दुसरीकडे विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने पाडकाम न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या सर्व प्रकारानंतर पोखरापूर ग्रामस्थांनी सोलापूर-पंढरपूर पालखी मार्ग रोखून धरला आहे. देशात हिंदुत्ववाद्यांचे सरकार असूनही अफजलखानाच्या वृत्तीच्या ठेकेदारांनी आमच्या जगदंबा मातेचे मंदिर पाडलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणे हे मंदिर वाचवायला हवे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत.

"पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा देवीचे मंदिर अनेक वर्षांपासून स्थित आहे. गावकऱ्यांनी मंदिर हटवण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली आहे. पण संबधित अधिकाऱ्यांनी होकार असल्याचे समजून कोर्टासमोर कागदपत्रे सादर केली. पुरातत्व विभागाने हे मंदिर जतन झालं पाहिजे अशी भूमिका घेतली होती. कोर्टात हे प्रकरण असताना त्यांनी आपलं म्हणणं फिरवलं आणि चुकीची कागदपत्रे सादर केली. त्यानंतर कोर्टाने पुर्नरोपण करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार आम्ही सहकार्य करत आहोत. पण ठेकेदाराच्या मशीनच्या सहाय्याने मंदिर पाडण्यात आले. कोर्टाच्या आदेशनुसार प्रत्येक दगडावर नंबर टाकून ते अवशेष जपायला हवेत. असे असतानाही ते मंदिर रातोरात उद्धवस्त केले आहे. या सर्व प्रकारामुळे गावात नाराजी पसरली आहे," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थाने दिली आहे.

"आज देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार असतानाही मंदिर रस्त्याच्या कामासाठी जमीनदोस्त करण्यात आले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतानाही 12 व्या शतकातील मंदिर अफजलखानाच्या वृत्तीने जमीनदोस्त करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांचे रक्षण केले होते तसे या सरकारनेही करायला पाहिजे होते," अशीही प्रतिक्रिया गावकऱ्याने दिली आहे.