Chipi Airport Inauguration : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांनी विकासकामांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सिंधुदुर्गात झालेल्या विकासासाठी राणे कारणीभूत आहोत. दुसऱ्याचे नाव येऊच शकत नाही, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं.
चिपी विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेची उद्धव ठाकरे यांनी सव्याज परतफेड केली. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. कारण शिवसेना आणि कोकण (Kokan) हे नातं काही वेगळं सांगायला नको. स्वत कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते या शिवसेनाप्रमुखांचं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कोणी काय केलं, कोणी काय करावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. योग्य वेळी बोलेनही कदाचित. पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. कोकणचं वैभव आज आपण जगासमोर नेत आहोत. जगातील अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. या सुविधांमधील सर्वात मोठा भाग असतो तो विमानतळाचा. आणि त्या विमानतळाचं आज लोकार्पण झालं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं
पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर राज्य येत ते आपल्या शेजारचं गोवा. पण आपली जी काही संपन्नता आहे, वैभव तेही काही कमी नाही. पण सुविधा काय आहे तिकडे, एव्हडी वर्ष विमानतळाला का लागली, एव्हडी खर्डेघाशी का करावी लागली. हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं. आजपर्यंत अनेक जण बोलून गेले की कोकणचं कॅलिफोर्निया करु, तेव्हा शिवसेनाप्रमुख बोलले होते की कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण निर्माण करु, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला.