'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी

Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 28, 2024, 05:20 PM IST
'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी title=

Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे (Thackeray Group) आणि राणे समर्थकांमध्ये (Narayan Rane) तुफान राडा झाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पुतळ्याची  पाहणी करण्यासाठी आले त्याचवेळी खासदार नारायण राणे किल्ल्यामध्ये होते.. यावेळी राणे समर्थकांनी आदित्य ठाकरेंना रोखल्यानं संघर्षाला सुरुवात झाली. यावर बोलताना खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली.  यापुढे आमच्या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या, मी बघतो, घरातून खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार नाही, अशी थेट धमकी नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. आमच्याकडून काहीही झालं नाही, मी काही चिरीमिरी नाही करत, नाहीतर एकही परत गेला नसता घरी असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले नारायण राणे?
मालवण किल्ल्यावर घडलेल्या घटनेनंतर खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. आम्ही आधी राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेलो होते, त्यावेळी त्यांचे लोक आमच्या अंगावर आले, आम्ही काहीच केलं नव्हतं. करायचं असतं तर आम्ही चिरीमिरी करत नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. आमच्यामुळे किल्ल्यावर राडा झाल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात, पण राड्यामुळेच शिवसेना नावारुपाला आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत एकतरी पुतळा उभारला आहे का? त्यांना महाराजांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी कोकणासाठी काय केलं? कोकणात किती प्रकल्प आणले, किती पूल बांधले? कोकणातील किती लोकांना नोकऱ्या दिल्या? असा सवाल नारायण राणे विचारले आहेत. 

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने विरोधक या मुद्द्याचं भांडवल करत आहेत,  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं निमित्त करुन महाविकास आघाडीतले तीनही पक्ष इथे आले, पण आजपर्यंत पुतळ्यसमोर नतमस्तक होण्यासाठी कधी आले नव्हते, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केलाय.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं.

राजकोट किल्ल्यावर नेमकं काय घडलं?
राजकोट किल्ल्यावर आधी निलेश राणे आले नंतर वडेट्टीवार आले नंतर राणे आले आतमध्ये गेले पाहणी केली तिथून बाहेर येतंच होते तेव्हा ठाकरे गट आला ते क्रॉस करून गेलेही तेव्हा घोषणाबाजी झाली आणि त्यानंतर राड्याला सुरुवात झाली. पुतळा होता त्याठिकाणी आदित्य चा ठिय्या तर दरवाज्या समोर राणे पिता पुत्र आणि कार्यकर्ते थांबून राहिले..नंतर राडा वाढला, दरम्यान जयंत पाटील यांनी मध्यस्थी केली त्यानंतर पोलिसांनी सुद्धा विनंती केली..तेव्हा पोलिसांनी मध्ये उभं राहून दोरखंड पकडून  पलीकडून आदित्य आणि इतरांना जाऊ देण्याची  सूचना केली त्याप्रमाणे सर्व बाहेर पडले जतानाही जोरदार घोषणाबाजी झाली.