विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : शिवसेनेच्या 40 आमदारांचं बंड यशस्वी झालं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यात सत्तेवर आलं. आता त्याची बक्षिसी मिळवण्यासाठी बंडखोर आमदारांची धडपड सुरू झाली आहे. येत्या 19 जुलैला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
या विस्तारामध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागावी, यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलंय. गेल्या मंगळवारी कळमनुरीचे आमदार संजय बांगर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत धडक दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचं स्वागत केलं. आता तोच कित्ता गिरवत संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे शेकडो समर्थक मुंबईला निघालेत.
शिंदेंच्या बंडात शिरसाट यांचा मोठा सहभाग होता. बंडानंतर शिरसाट यांनी संभाजीनगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आपली ताकद दाखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे..
बांगर आणि शिरसाट यांच्यापाठोपाठ सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार देखील शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शुक्रवारी सत्तार यांचे समर्थक मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थनासाठी हे शक्तिप्रदर्शन सुरू असल्याचं सांगितलं जातंय.
संभाव्य मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी आमदारांनी आपापली फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय. हे शक्तिप्रदर्शन कुणाला मंत्रिपद मिळवून देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.