मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह

साताऱ्यातील अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: May 18, 2020, 10:22 AM IST
मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह  title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलंय. लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईतील अनेकजण आपापल्या गावी जात आहेत. मात्र असं गावी जाणं आता गावकऱ्यांसाठी धोक्याचं असल्याचं उघडकीस आलं आहे. 

सातारा-म्हाते खृर्द जावली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतून आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यी झाला. मात्र कुटुंबियांनी तब्बल ६ दिवस हा मृतदेह राहत्या घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

२७ मार्च रोजी कोरोनाचा पार्श्वभूमीवर १५ वर्षीय मुलासह मुंबईतून गावी आले होते. हा मुलगा गेल्या सात-आठ महिन्यांपासून आजारी होता. मुंबईहून येऊन दीड महिना झाल्यानंतर मुलाचा घरातच मृत्यू झाला. मात्र कुटुबियांनी ही बाब लपवून ठेवली. याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांना अथवा गावकऱ्यांनी दिली नाही. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्या लोकांनी घरात जाऊन पाहिले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. 

या घटनेनंतर मेढा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. मुलाला कोरोनाची लागण तर झाली नव्हती ना? असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आला आहे. जर मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर सहा दिवस मृतेदह घरात ठेवणं खूप धोकादायक आहे. यामुळे कुटुंबातील इतरांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुलाच्या पालकांनी मृतेदह घरातच ठेवण्यामागचं कारण काय? असा देखील प्रश्न उभा राहत आहे.