दुसऱ्यांच्या मैत्रिणीबरोबर कशाला फिरतोस? पुण्यात टेकडिवर फिरायला गेल्या तरुणाला संपवलं

पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेल्या तरुणावर आरोपींनी जाब विचारला, काही कळायच्या आतच आरोपींनी तरुणावर चाकूने हल्ला केला

Updated: Dec 9, 2022, 05:26 PM IST
दुसऱ्यांच्या मैत्रिणीबरोबर कशाला फिरतोस? पुण्यात टेकडिवर फिरायला गेल्या तरुणाला संपवलं title=

सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे : पुण्यात (Pune) क्षुल्ल्क कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन आरोपींची नावे देखील निष्पन्न झाली आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण?
साहिल कसबे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. साहिल गुरुवारी संध्याकाळी आपल्या काही मित्र आणि मैत्रिणींसोबत तळजाई टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. टेकडीवर साहिल आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसला होता. याचवेळी तीन तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी साहिलला दुसऱ्यांच्या मैत्रिणीसोबत कशाला फिरतोस म्हणून जाब विचारला. 

यावरुन साहिल आणि त्या तरुणांमध्ये वाद झाला. संतापलेल्या तरुणांनी साहिलला लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका तरुणाने अचानक चाकू काढून साहिलवर वार केले. साहिलच्या मानेवर, पोटावर आणि डोक्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या साहिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने साहिलाच मृत्यू झाला.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्थानकात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींची ओळख पटवण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

पुण्यात गंभीर गुन्ह्यात वाढ
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या हतेच्या बदला घेण्यासाठी पाच जणांच्या टोळीने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली. तुझी विकेट पाडतो असं म्हणत टोळीने तरुणावर हल्ला केला. तरुणावर कोयत्याने वार करण्यात आला, या हल्ल्यातून तो कसाबसा सुटला, पण आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.