पुणे : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांनी आईस्क्रीम (Ice Cream) फेकून दिल्याचा राग आल्याने दोन मुलींनी आईच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी आईसह दोन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
काय आहे नेमकी घटना?
पुण्यातील वडगाव शेरी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 2 डिसेंबरची असून सतीन जाधव असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सतीन जाधव हे नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आले. घरी जेवण बनवण्यात आलं नव्हतं. मुलींनी बाहेरुन आईस्क्रिम विकत आणलं होतं. सतीन जाधव यांनी पत्नी शामला जाधव (वय 57), स्नेहल अमोलिक (वय 38) आणि तेजस्वी अमोलिक (वय 34) यांना याबाबत विचारणा केली. मी चपात्या खाणारा माणूस आहे, आईस्क्रिमने माझं पोट भरणार नाही असं जाधव यांनी पत्नी आणि मुलींना सांगितलं. त्यानंतर सतीन जाधव यांनी रागात आईस्क्रिम फेकून दिलं.
पत्नी आणि मुली संतापल्या
सतीन जाधव यांनी आईस्क्रिम फेकून दिल्याचा राग मुलींना आला. संतापलेल्या मुलींनी आईची मदत घेत वडिलांशी भांडण उकरुन काढलं. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी वडिल सतीन जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नी आणि मुलींनी अक्षरश: लाथा बुक्क्यांनी सतीन जाधव यांना मारहाण केली. त्यांचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं. भिंतीवर डोकं आदळल्याने सतीन जाधव यांच्या मेंदूला जबर मार बसला आणि गंभीर जखमी झाले.
हे ही वाचा : आताची मोठी बातमी! महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचाली
पत्नी आणि मुलीविरोधात केली तक्रार
घडलेल्या प्रकाराबाबत सतीन जाधव यांनी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी शामला जाधव, स्नेहल आणि तेजस्वी अमोलिक यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ३२३, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे