वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात अंधश्रद्धेमुळे एका 17 वर्षीय युवतीला आपला (Shocking! 17 years old girl died because of Black Magic ) जीव गमवावा लागला आहे. एरंडोल तालुक्यातल्या कासोदा गावानजीक असलेल्या वनकोठे गावात आदिवासी कुटुंबातील शारदा रामचंद्र भिल असे या युवतीचे नाव असून घर सावरत असताना अचानक सर्पाने शारदाला दंश केला होता. मात्र कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात न नेता देव ठाण्यावर नेलं. अंधश्रद्धेमुळे अखेर शारदाला आपला जीव गमवावा लागला.
पुरोगामी महाराष्ट्रात आज ही अंधश्रद्धेला खतपाणी दिले जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या कासोदा नजिक असलेल्या वन कोठे गावातील शारदा रामचंद्र भील या 17 वर्षीय युवतीचा अंधश्रद्धेने बळी घेतला आहे.
शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती घर सारवत असताना अचानक सर्पाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडा ओरडा केला त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले. काहीजणांनी सर्प चावलेल्या भागावर विष शरीरात पसरून नाही म्हणून सर्प दोष केलेल्या दोन ठिकाणी पट्टीने घट्ट बांधले. मात्र शारदाच्या पालकांनी शारदाला उपचारासाठी दवाखान्यात न नेता अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फाफोरे येथे एका बाबांच्या ठाण्यावर सर्पाचे विष उतरवण्यासाठी नेले.
शारदाला दिवसभर ठेवल्यानंतर उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पालकांनी तिला वनकोठे येथे परत घरी आणले. परंतु तोपर्यंत शारदाची शुद्ध हरपली होती. गावातील सरपंच व सुज्ञ नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी शारदाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी शारदाला मृत घोषित केले . खरंतर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय अशी ही घटना असून आजही समाजात अंधश्रद्धेला खत पाणी दिल्या जात आहे हे दुर्दैव म्हणावे लागेल.