अशोक चव्हाणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी, राऊतांचं ही मौन

भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न

Updated: Jan 21, 2020, 11:43 AM IST
अशोक चव्हाणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी, राऊतांचं ही मौन title=

मुंबई : अशोक चव्हाण सध्या चांगलेच वादात अडकलेत. मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेस सत्तेत आहे असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं. सीएए विरोधात आयोजित रॅलीत त्यांनी केलेल्या धक्कादायक विधानानंतर आता राजकारण रंगलं आहे.

नांदेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध कऱण्यासाठी आयोजित रॅलीत बोलताना अशोक चव्हाणांचं हे धक्कादायक वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. भाजप हा मुस्लिमांचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं मुस्लिम समाजाने आपल्याला सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मुस्लिमांनी सांगितल्यामुळेच काँग्रेस राज्यात सत्तेत सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. 

अशोक चव्हाणांचं वक्तव्य म्हणजे मुस्लिमांचं लांगुलचालन करून केवळ व्होटबँक म्हणून वापर करणं असल्याची टीका भाजप नेते राम कदम यांनी केली. तर हिंदुत्वाचा राग आळवणारी शिवसेना गप्प का असा सवालही विचारला. तर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेनंही मुस्लिमांचा अनुनय केला का असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

सीएए विरोधी रॅलीत अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेची पंचईत झाल्याचं दिसून येतंय. अशोक चव्हाणांवर टीका करताना भाजप नेते शिवसेनेला टोले मारत आहेत. महाविकास आघाडीच्या बचावासाठी नेहमी धावून येणारे फायरब्रँड संजय राऊतांनी यावेळी मात्र मौन बाळगणच पसंत केलं. 

त्यामुळे अशोक चव्हाणांनी मुस्लिमाबाबत वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.