शिवसेनेचा 'हा' खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? 'या' गोष्टीने चर्चांना उधाण

शिवसेना खासदाराने का घेतली केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची बाजू ?

Updated: Jul 24, 2022, 05:18 PM IST
शिवसेनेचा 'हा' खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? 'या' गोष्टीने चर्चांना उधाण title=

मुंबई : राज्यात शिवसेना आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना खासदार देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर आता आणखीण एक खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या खासदाराने ट्विट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. 
 
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर कॉग्रेसने बेकायदेशीर बार चालवल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आता शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी स्मृती इराणी यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. देशात रेस्टॉरंट चालवण्याचा परवाना मिळविण्याची प्रक्रिया काय असते हे १८ वर्षांच्या मुलांना कळणार नाही, अशा आशयाचे ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. 

 प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत की, भारतात रेस्टॉरंट चालवण्यासाठी परवाने मिळवण्याची शिक्षा ही 18 वर्षांच्या मुलांना कदाचित माहीत नसेल. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवूया असे आवाहन त्यांनी या प्रकरणात केले आहे. तसेच मीही १९ वर्षांच्या मुलाची आई आहे, असेही त्यांनी म्हटलेय. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी स्मृती इरानींच नाव घेतलं नाही आहे. पण या ट्विटमधून त्यांनी स्मृती इरानींना समर्थन दिल्याचं बोललं जातंय.  

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांना समर्थन दिल्याने आता त्याही शिंदे गटात सामील होतील अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. मात्र या सर्व फक्त चर्चा आहे. यावर अद्याप तरी प्रियंका चतुर्वेदी यांनी काहीच विधान केले नाही.  

कॉग्रेसचा आरोप काय? 
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्र्यांना त्वरित मंत्रीपदावरून हटवावे, अशी  मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली. दरम्यान, इराणी यांच्या कन्येच्या वकील कीरत नागरा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.