'हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत'

 हिंमत असेल तर या अंगावर असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

Updated: Nov 19, 2019, 08:08 AM IST
'हिंमत असेल तर या अंगावर, आम्ही तयार आहोत' title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबी ठाकरे यांच्या सातव्या स्मृतीदिनी शिवसेना एनडीएतून बाहेर असल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेनेच्या मनात याची सल खोलवर गेल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून यावरून भाजपाप्रणिक एनडीएचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. मंबाजीच्या राजकारणाची उलटी गिनती सुरु झाली असून हिंमत असेल तर या अंगावर असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

काँग्रेस राष्ट्रवादीशी शिवसेनेचे संबध जुळल्याने शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढले असून त्यांच्या खासदारांची जागा आता विरोधी बाकांवर करण्यात आल्याचे प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. याचा शिवसेनेतर्फे खरपूस समाचार घेण्यात आला आहे. ज्या वाकडतोंड्याने ही घोषणा केली त्याला शिवसेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म-धर्म माहीत नसून सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्याचा टोला देखील लगावण्यात आला आहे. 

शिवसेनेला मोठा इतिहास असून एनडीएतून बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी तो समजून घेतला पाहीजे. शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत आणि कोणत्या आधारावर घेतला ? याचे उत्तर देखील शिवसेनेने मागितले आहे.

पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्ती आणि मोदींवर टीका करणाऱ्या नितिश कुमार यांच्याशी नातं जोडताना एनडीएची परवानगी घेतली होती का ? असा प्रश्न 'सामना'तून विचारण्यात आला आहे.