शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज असल्याची चर्चा असून ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Updated: Jan 3, 2020, 11:10 AM IST
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, खानापूर : विटा खानापूरचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर नाराज असल्याची चर्चा असून ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. केंद्र आणि राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजपमध्ये फारकत आल्यानंतर सांगलीत बाबर यांनी भाजपला पाठींबा दिल्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विटयात शनिवारी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपाशी युती असल्याने आणि ते आमचे नैसर्गिक मित्र असल्याने आम्ही भाजपला पाठींबा दिल्याचे बाबर यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार अनिल बाबर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सत्तेसाठी जिल्हा परिषदेत युती केली नाही. पक्षाचा आदेशच नाही आणि भाजपशी जिल्हा परिषदेत युती असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी केला. 

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. सोशल मिडीयातून अनेक कार्यकर्ते त्यांची मते व्यक्त करत आहेत. अशावेळी त्यांच्याशी हितगुज करणे आणि आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी खानापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा शनिवारी विटयात 4 जानेवारी रोजी पंचफुला मंगल कार्यालयात मेळावा आयोजित केल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

खडसेंची मनधरणी 

देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हेच माझं तिकीट कापण्यात कारणीभूत आहे असा गौप्यस्फोट भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. दरम्यान, खडसे शिवसेनेच्या संपर्कात होते, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबाबत संकेतही दिले होते. या पार्श्वभुमीवर खडसेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जळगावात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची भेट होणार आहे. फडणवीसांच्या भेटीसाठी खडसे जैनहिल्सकडे रवाना झाले आहे. जैनहिल्स येथील श्रद्धाधाम येथे बैठक होत आहे. मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे यांनी जे पी नड्डा यांच्याशी बातचीत करून राज्याच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुरावेही सादर केले होते.