Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यंदा आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. विधानसभेत महायुतीला यश मिळाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईच्या ताज लँण्ड्स एंड हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं आहे. यावेळी प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला त्याची चांगली फळं आज बघायला मिळत आहेत असं सूचक विधानही त्यांनी केलं.
"गेल्या मंत्रीमंडळात मी त्याग केला होता, मला आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र यंदा ते आश्वासन पूर्ण होऊन मला चांगलं कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे," असं प्रताप सरनाईकांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं असंही त्यांनी म्हटलं आहे. शेवटी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी सांगितलं आहे.
सत्तेत शिवसेनेला योग्य वाटा मिळेल का? असं विचारलं असता ते म्हणाले, "आम्हाला वाटा मागण्याची गरज वाटणारच नाही. महायुतीचे नेते तितके सक्षम आहेत. महायुतीचा वाटा न मागता देण्याची प्रथा आहे. आमचा तसा इतिहास आहे. अजित पवार आल्यानंतर त्यांनाही तितकीच, आम्हालाही तितकीच मंत्रीपदं दिली. स्वत:कडे जेवढी मंत्रीपदं आहेत तेवढीच आम्हाला दिली. भाजपा अशा गोष्टीत तडजोड करत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला काही मागण्याची गरज नाही".
"ज्या ठाणेकर जनतेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना पाहायला आवडेल, त्यांना मलाही मंत्री म्हणून पाहायला आवडेल. गेल्यावेळी मला तसं आश्वासन दिलं होतं. पण काही गोष्टींमुळे ते पूर्ण झालं नाही. पण यावेळी पूर्ण होईल असा विश्वास आहे. 100 टक्के कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याची मला खात्री आहे. पण त्यागातही चांगले दिवस येतात. गेल्या निवडणुकीत त्याग केला होता, आता करावा लागणार नाही अशी आशा आहे," असा विश्वास प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला आहे.
"मला जर पक्षाचा आमदार म्हणून किंवा शिंदेचा 30 वर्षांचा सहकारी म्हणून विचारत असाल तर आम्ही दोघांनी महापालिकेत एकत्रित नगरसेवक म्हणून काम केलं. आज ते पाचव्यांदा आणि मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहे. सर्वात जास्त मताधिक्याने आम्ही निवडून आलो आहोत. मला सर्वात जास्त 1 लाख 85 हजारांचं मताधिक्क्य मिळालं आहे. या सर्व बाबींचा विचार करता ज्या चेहऱ्याच्या आधारे इतकं भरभरुन मतदान झालं ते पाहता तो चेहरा मुख्यमंत्रीपदी असावं असं आम्हाला वाटतं. शेवटी निर्णय वरिष्ठांचा आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे," असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
"आम्हाला जेव्हा वाटलं नव्हतं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली होती. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमित शाह यांनी त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली जाईल असं सांगितलं होतं. पण अखेर वरिष्ठच निर्णय घेतील," असं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले, "भाजपाच्या आमदारांना विचारलं तर ते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्वादीचे नेते अजित पवारांना मुख्यमंत्री करा असं सांगतील. त्याप्रमाणे आम्हालाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं. राजकारणात त्याग करावाच लागतो. जनतेला चांगल्या गोष्टी द्यायच्या असतील त्यासाठी त्याग करावा लागतो. जर देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला नसता, तर आज हे दिवस दिसले असते का? आजचे अच्छे दिन हे त्या त्यागाचं प्रतीक आहे. भविष्य उज्वल असतं. मला जो एकनाथ शिंदेंचा इतिहास माहिती आहे त्यानुसार त्यागाचं खरं प्रतिक आणि दुसरं नाव एकनाथ शिंदे आहे".