'हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार' मुख्यमंत्री

संतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलं निवेदन

Updated: Dec 21, 2022, 02:58 PM IST
'हे सरकार वारकऱ्यांचं, सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार' मुख्यमंत्री  title=

Maharashtra Winter Session : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी हिंदू धर्म, संत आणि वारकरी संप्रदायाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याविरोधात राज्यातील वारकरी संप्रदायातील किर्तनकारांनी (Kirtankar) त्यांच्यावर टीकेची झोड उठवत सुषमा अंधारे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या समन्वयाने वारकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि निवेदन देण्यासाठी पाचवे संप्रदायातील प्रमुख 10  संघटना आणि जवळपास 30 जणांचे शिष्ट मंडळ यांनी रामगिरी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यावर कारवाईची मागणी
सुषमा अंधारे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसह महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये आणि त्याबाबत कठोर कायदा पारित करावा यासाठी राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागले याने मन व्यतिथ झालं असं म्हटलं आहे. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जोपासण्यात वारकरी संप्रदायाची मोठी भूमिका आहे. हे सरकार वारकऱ्यांचे आहे  निश्चित आपण दिलेल्या निवेदनावर कार्यवाही होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकरी संप्रदायाला आम्ही राजकारणात ओढू इच्छित नाही. मात्र आमच्या संतांचा देखील अपमान विरोधकांनी करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

एका सुषमा अंधारेंसाठी लाखोंचा वारकरी संप्रदाय नाराज करु नये, असं अक्षयमहाराज भोसले यांनी म्हटलंय. गेली अनेक वर्ष याआधीच्या मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली, पण आमच्या पदरी निराशा आली. मुख्यमंत्री म्हणजे वरिष्ठ आणि महाराष्ट्रात सर्वात मोठं पद आहे. मात्र त्यांच्या राजीनामा नंतर देखील ते सर्वसामान्य वारकऱ्यांच्या भावना समजून घेऊ शकत नाही. याउलट एकनाथजी शिंदे यांना वारकरी येणार हे समजता क्षणी अत्यंत आदरपूर्वक त्यांनी वारकऱ्यांचा सन्मान केला आणि जणू पंढरपूरचा पांडुरंग आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला ही भावना व्यक्त केली. 

सुषमा अंधारे यांनी मागितली होती माफी
विरोध झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. तसंच आपल्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप होत असून हे भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचे लोक आहेत, असं सांगत सुषमा अंधारे यांनी भाजपच्या वारकरी आघाडीवर सडकून टीका केली आहे

हे ही वाचा : Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

काय होतं ते वादग्रस्त वक्तव्य?
सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली त्यामुळं त्यांना माऊली म्हटलं गेलं. परंतु माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर माझ्या आईनं 15 एकर कोरडवाहू शेतीत काम करून चार भिंतीचं घर चालवलं, ती माझ्यासाठी विश्ववंदनीय असायला हवी, असं सुषमा अंधारेंनी केलं होतं.