शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला

अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत

Updated: Aug 27, 2020, 08:37 AM IST
शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला title=

मुंबई: राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून अनेकदा सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा गांधी कुटुंबीयांची पाठराखण केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील २३ ज्येष्ठांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित केली होती. या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांचाही समावेश होता. 

राहुल गांधींनी लवकर हालचाली कराव्यात, अन्यथा.... शिवसेनेचा इशारा

या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या ज्येष्ठांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली आहे. पत्र लिहणारे नेते सत्तरी ओलांडलेले आहेत. देशपातळीवर सोडा पण राज्य किंवा जिल्हापातळीवरही लोकनेता म्हणून त्यांची ओळख नाही. सोनिया गांधी यांच्याकडे सक्रियतेचा आग्रह धरणाऱ्या या नेत्यांना पक्षाला सक्रिय करण्यासाठी कोणी रोखले होते? यापैकी अनेकांनी काँग्रेस किंवा नेहरू-गांधी परिवाराच्या बळावर मुख्यमंत्रीपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत, याची आठवण शिवसेनेने करून दिली आहे. 

तसेच पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाला सक्रिय अध्यक्ष हवा, अशी मागणी केल्याची मोठी गंमत वाटते. मुळात पक्षाला सक्रिय करण्यासाठी या नेत्यांना कोणी रोखले आहे? ७० वर्षाच्या सोनिया गांधी यांनी पक्षांतर्गत संगीत खुर्ची, खो-खो, हुतूतू, आटपाट्यांचे सामने भरवून सक्रियता दाखवावी, असे या मंडळींना वाटते काय, असा सवालही शिवसेनेने काँग्रेसमधील ज्येष्ठांना विचारला आहे.

राहुल गांधी हे सक्रिय होतेच व त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालची टीका झाली तेव्हा काँग्रेसचे 'सक्रिय' पुढारी कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळ्याने केले आहे, अशी टीकाही शिवसेनेकडून करण्यात आली आहे.