मुंबई : युतीत लढले असले तरी शिवसेना-भाजपमधील सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटलेला नाही. शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने मुख्यमंत्रीपद पारड्यात पाडून घेण्याचा शिवसैनिकांची मागणी आहे. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप स्वबळावर लढले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १२२ जागा जिंकत आपला मुख्यमंत्री बनवला होता. राष्ट्रवादीचा सुरुवातीला पाठिंबा घेत ३१ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. भाजपच्या सरकारमध्ये सुरुवातीला शिवसेना सहभागी झाली नव्हती. मात्र काही काळानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
२०१९ मध्ये चित्र वेगळं होतं. शिवसेना-भाजप महायुती म्हणून एकत्र लढले. भाजपला १०५ जागा तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. पण किंगमेकर असलेल्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर आता वाढली आहे. शिवसेना-भाजपमध्ये अद्याप कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही. दोन्ही ही पक्षाचे नेते स्वतंत्र राज्यपालांना भेटले. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरु आहे. पण ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त यंदा मात्र चुकला आहे. आता सत्ता स्थापन कधी होणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फेटाळून लावली आहे. भाजप शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवणार आहे. अमित शाहांच्या मुंबईतल्या भेटीत हा प्रस्ताव ठेवला जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद आणि काही मंत्रिपदं वाढवून देण्याची शक्यता आहे. शिवाय केंद्रात ही एक मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. पण शिवसेना हे मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेने आज विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव विधिमंडळ नेतेपदासाठी सुचवलं. यानंतर पक्षातील इतर सदस्यांनी एकमताने आदित्य यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. चंद्रकांत पाटील यांच्या या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १० आमदारांनी अनुमोदन दिलं. हरिभाऊ बागडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, सुनील देशमुख, देवराम होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आशिष शेलार यांनीही या प्रस्तावाला अनुमोदन दिलं.