खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदचा खोडसाळपणा केल्याचा सेनेचा भाजपवर आरोप

Updated: Jan 17, 2020, 08:09 AM IST
खोडसाळपणाचा आरोप करत 'शिवप्रतिष्ठान'च्या सांगली बंदला शिवसेनेचा विरोध title=

सांगली : आजच्या सांगली बंदला शिवसेनेनं विरोध केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांचा सर्वसामान्यांशी संवाद होऊ नये म्हणून भाजपनं सूडबुद्धीनं 'शिवप्रतिष्ठान'च्या माध्यमातून बंद पुकारल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. नागरिकांनी या बंदला भीक घालू नये, असं आवाहनही शिवसेनेनं केलंय. तसंच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची जबाबदारी 'शिवप्रतिष्ठान'ची असेल असा इशारा स्थानिक नेते धर्मेंद्र कोळी यांनी दिलाय.

शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं बंद पुकारण्यात आलाय, असं शिवप्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात येतंय. शिवप्रतिष्ठान नेहमीच उदयनराजेंच्या मागे भक्कम उभी राहिलीय. यावेळीही आमचा राजेंना पाठिंबा आहे, असं सांगत संभाजी भिडे यांनी सांगली बंदचं आवाहन केलं आहे. उदयनराजेंचा अपमान करणाऱ्या आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या राऊतांना मुख्यमंत्र्यांनी पदावरून हटवावं, अशी मागणीही संभाजी भिडेंनी केलीय.

राऊत विरुद्ध राजे

शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यमान वंशजांनाच शिंगावर घेतलंय. छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावाच राऊतांनी मागितल्यानं राऊत विरुद्ध राजे असा जोरदार संघर्ष पेटलाय. भाजप नेते असलेले छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या वंशजांच्या विरोधात राऊतांचा दांडपट्टा जोरात सुरू आहे. तिन्ही राजे देखील मागे हटायला तयार नाहीत. छत्रपती घराण्याबाबत वाट्टेल ते बरळू नका, असा दमच तिन्ही राजांनी भरलाय. राऊत विरुद्ध राजे या वादात भाजपनंदेखील आक्रमक पवित्रा घेतलाय. राऊतांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम आणि प्रसाद लाड यांनी आंदोलन केलं. तर राऊत या माणसाची बुद्धी ठिकाणावर आहे का? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनाच संजय राऊतांनी थेट आव्हान दिल्यानं त्यांच्याविरोधात आगडोंब उसळलाय. हा संघर्ष काय वळण घेतो, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.