नाशिक : विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.
एकूण २० हजार मतदानापैकी बाद मते ६३३, नोटा २६ तर वैध मते १९३४१ ठरली आहेत. यात किशोर दराडे ( शिवसेना ) ७९२४, संदीप बेडसे ( राष्ट्रवादी ) ३४२७, भाऊसाहेब कचरे ( अपक्ष ) २८७८, अनिकेत पाटील ( भाजप ) १९४६, अजून २९०० मते मोजणे बाकी आहे. दरम्यान, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे पहिल्या फेरीत आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत.
विधानपरिषदच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यादा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र अजून विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड राखल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
कोकण पदवीधरच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेचे संजय मोरे यांनी २००० पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे दुसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र या तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी असल्याने काटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे.