दुष्काळग्रस्तांची थट्टा : शिवसेनेची जनावरे, भाजपच्या दावणीला

 दुष्काळग्रस्तांची थट्टा करणाऱ्या जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला.  

Updated: Dec 7, 2018, 11:39 PM IST
दुष्काळग्रस्तांची थट्टा : शिवसेनेची जनावरे, भाजपच्या दावणीला title=

औरंगाबाद : दुष्काळग्रस्तांची थट्टा करणाऱ्या जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यावरून औरंगाबादमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला. दुष्काळात आपली जनावरं पाहुण्यांच्या घरी घेऊन बांधा, असा अजब सल्ला राम शिंदेंनी दिला होता. त्यावरून शिवसेनेनं आज औरंगाबादमध्ये आगळंवेगळं आंदोलन केलं. शिवसेनेने  भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा कार्यालयासमोर जनावर नेऊन बांधण्याचा प्रयत्न केला. 

'आपली जनावरं चारायला, चला पावण्याच्या दाराला' अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. शिवसेनेवाले जनावरं आणणार असल्याचं कळल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही कार्यालयाबाहेर चारा आणि कडबा आणून ठेवला. यानिमित्तानं शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं, त्यामुळं पुढचा वाद टळला.

भाजप मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे चारा नाही. भाजप आमचे पाव्हणे आहेत. त्यामुळे आम्ही आमची जनावरे भाजपच्या कार्यालयावर घेऊन निघालो आहोत, असे म्हणत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरम्यान, भाजपच्या मंत्र्यांनी केलेले विधान म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही ही जनावरे आता भाजपच्या कार्यालयात घेऊन चाललो आहोत. जनावरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी भाजपचीच आहे, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.