अर्जुन खोतकर कुणाला म्हणाले, 'या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलेलं नाही'

भाजप नेते नितेश राणे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर दंगली भडकवल्याचा गंभीर आरोप केला आहे

Updated: Nov 16, 2021, 04:37 PM IST
अर्जुन खोतकर कुणाला म्हणाले, 'या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलेलं नाही' title=
संग्रहित फोटो

जालना : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी शिवसेना (Shiv Sena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रझा अकादमीने (Raza Academy )नांदेडमध्ये आयोजित केलेल्या आंदोलनाविरोधात कारवाई कऱण्याची मागणी करत अर्जुन खोतकर यांनी रझा अकादमीच्या मंचावर भडकाऊ भाषण केल्यामुळे अमरावतीमध्ये दंगली झाल्या असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. 

यांसदर्भात नितेश राणे यांनी अर्जुन खोतकर आणि रझा अकादमीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात यावी असं पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. तसंच पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून अर्जुन खोतकर यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत या वादग्रस्त भाषणामुळेच हिंसा झाल्याचे म्हटलं आहे. 

अर्जुन खोतकर यांचं उत्तर
भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनीही उत्तर दिलं आहे. 'या फुटाण्या-शेंगदाण्याला काही काम राहिलं नसून हे किती बेअकली लोक आहे हे यावरून समोर आल्याचं' खोतकर यांनी म्हटलं आहे. आपण नांदेडला गेलोच नसल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. मी जालन्यातील रजा अकादमीच्या मोर्चात जाऊन तिथे शांतता आणि सलोखा राहण्याचं आवाहन केलं असंही खोतकर म्हणाले. 

मी नांदेडला गेलोच नव्हतो असा निरोप त्यांना समजल्यानंतर आता भाजप नेते तोंडघाशी पडले असून भाजपच्या लोकांना जालन्यात घुसू न दिल्यानं जालन्यात दंगल झाली नाही अन्यथा जालन्यात देखील अमरावती सारखी दंगल झाली असती असं सांगायला देखील खोतकर विसरले नाहीत. जान्यातल्या मोर्चात मी असल्यानं दंगल झाली नाही ही भाजपची खरी पोटदुखी आहे असा टोलाही खोतकर यांनी लगावला आहे.

पोलीस अॅक्शन मोडमध्ये

रझा अकादमीच्या मंचावर अनेक राजकीय नेत्यांनी भाषणं केली. त्यात प्रक्षोभक भाषण करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल होणार असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं आहे. दंगलीची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक नांदेडमध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 83 पैकी 50 दंगेखोरांना अटक करण्यात आली. त्यातले 10 आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.