Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे. आमदारांनी पाठिंबा काढून घेताच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) राज्यात सत्ता स्थापन केलीय. ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आक्रमक होत सातत्याने टीका केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटातील नेते शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडले आहेत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांची शिंदे गटावर टीका करताना जीभ घसरली आहे.
हीच त्यांची लायकी आहे - अंबादास दानवे
शिंदे गटातील आमदारांना वाणी साहेब असते तर बुटाने मारले असते असे विधान अंबादास दानवे यांनी केले आहे. वैजापूर येथील सभेत बोलताना अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे. "काही जणांना विचारले खोके खरं आहेत का तर ते खोके खोटे थोडी आहेत असे म्हणतात. आमच्याकडच्या एका आमदाराने त्याबाबत म्हटलं आहे. यांना खोके सलतात. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या जनतेच्या समोर यायला पाहिजेत. आज वाणी साहेब असते तर बुटाने मारलं असतं. बुटचं काढतो एवढंच म्हणाले असते. त्यामुळे यांची हीच लायकी आहे आणि राहणार आहे," अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.
अंबादास दानवे यांची सारवासारव
बंडखोरांना बुटाणे मारा हे माझं मत नाही तर आमदार वाणी साहेब असते तर ते म्हणाले असते असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. वाणी साहेब असते तर ते असं म्हणाले असते. हा त्यांच्या स्वभावाचा पैलू होता असं म्हणत अंबादास दानवे यांनी सारवासारव केली आहे.
पक्ष सोडून जातायतत र काही बदल होणे गरजेचे- निलम गोऱ्हे
शिवसेनेत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर अजूनही गळती सुरुच आहे. राज्यात अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे समर्थक त्यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या महिला नेत्या निलम गोऱ्हे यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. "पक्षाची अशी दोन शकलं होणे वाईट आहे. दोन ठिकाणी ही जयंती साजरी होत आहे. संबंध महाराष्ट्राभर ती साजरी केली जाते आहे. हा मॉं साहेबांचा मोठेपणा आहे. लोक सोडून जावू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. पण त्यात काही कमतरता असतील. लोक तिथे जात असतील तर त्यात बदल करणे गरजेचे आहे," अशी भावना नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.