Palghar Shark Attack: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. मनोरी येथील वैतरणा खाडीत एका युवकावर शार्कने हल्ला केला होती. गंभीर जखमी झालेल्या युवकाला या हल्ल्यात पाय गमवावा लागला आहे. वैतरणा खाडीत घडलेल्या या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, तरुणावर हल्ला करणाऱ्या मादी शार्क माशाचाही मृत्यू झाला आहे.
मनोरी डोंगरी येथील विकी गोवारी यामे मासे पकडण्यासाठी खाडीत जाळे लावले होते. मासे काढण्यासाठी तो मंगळवारी खाडीत उतरला होता. त्याचवेळी त्याच्यावर सात फूट लांब आणि 500 किलो वजनाच्या मादी शार्कने हल्ला केला. या हल्ल्यात विकी गंभीर जखमी झाला होता. विकीने कसा बसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. मात्र, त्याचा पाय रक्तबंबाळ झाला होता. स्थानिकांनी त्याला लगेचच रुग्णालयात दाखल केले.
शार्कचा हल्ला इतका गंभीर होता की विकीचा पायाच्या गुडघ्यापासूनचा भाग डॉक्टरांना कापावा लागला. विकीवर सिल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, विकीवर हल्ला करणारा मादी जातीचा हा शार्कदेखील मृतावस्थेत सापडला आहे. या माशाला जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहे. बुल शार्क या जातीचा हा मासा होता.
विकीवर हल्ल्या केल्यानंतर स्थानिकांनी मादी शार्कला पकडले होते. त्यानंतर खआडी किनारी मादी शार्क मृतावस्थेत आढळून आला. या मादी शार्कच्या पोटातून 15 पिल्ले काढण्यात आली आहेत. या प्रत्येक पिल्लाचे वजन 5 किलो इतके आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्क माशाचे वजन 450 किलो असून लांबी 2.95 मीटर आहे. जेसीबीच्या मदतीने या मादी शार्कला बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी त्याच्या गर्भाशयातून पिल्लू बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तपासणी केली असता माशाच्या गर्भाशयातून बेबी बूल शार्क बाहेर येताना दिसले.तब्बल 15 पिल्ले मादी शार्कच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. या पिल्ल्यांचाही मृत्यू झाला होता.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मादी शार्क प्रसूतीसाठी खाडीत शिरली असावी. पाण्याची खोली कमी असल्याने व ओहोटी असल्याने ती तिथेच अडकून पडली. त्यामुळं चिडलेल्या माशाने विकीवर हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मनोर वन परिक्षेत्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन हा मृत मासा ताब्यात घेतला. त्यानंतर त्यावर अतसंस्कार करण्यात आले.