...म्हणून ते भाजपसोबत गेले; राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा

ईडीच्या दबावामुळे काही सहकारी भाजपसोबत गेले. राष्ट्रवादीतल्या फुटीवर शरद पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

Updated: Aug 20, 2023, 10:08 PM IST
...म्हणून ते भाजपसोबत गेले; राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांचा सर्वात मोठा दावा title=

Sharad Pawar : अजित पवार यांचा एक मोठ गट शिंदे फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले आहेत.  राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. पक्ष फुटीवर शरद पवार यांनी प्रथमच कारण देत खुलासा केला आहे.  

काय म्हणाले शरद पवार?

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीवर शरद पवारांनी खळबळजनक दावा केला आहे.  ईडीच्या दबावामुळे काही सहका-यांनी पक्षांतर केलं आणि ते भाजपसोबत गेले असा हल्लाबोल पवारांनी केला आहे. अजित पवार गटावर पहिल्यांदाच शरद पवारांनी जाहीरपणे ही टीका केली आहे. 

अनिल देशमुखांवर दबाव आणला. ते 14 महिने तुरुंगात होते. मात्र ते भाजपसोबत गेले नसल्याची आठवणही शरद पवारांनी यावेळी करुन दिली. तसंच सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही ईडीमुळे जेलवारी करावी लागल्याचा उल्लेखही पवारांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी आणीबाणीतही माफीनामा लिहून दिला नाही अशी आठवण करुन देत मुनगंटीवारांनी पवारांवर पलटवार केला.

2 जून रोजी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 40 आमदारांसहीत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवारांबरोबर शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. 

भाजपसोबत जाऊन कुणी बरोबर ठरत नाही; कन्हैय्या कुमार यांचा टोला

कोल्हापुरातल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कन्हैय्या कुमार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. भाजपसोबत जाऊन कुणी बरोबर ठरत नाही.. तर चुकीचा आहे तो चुकीचाच आहे असा टोला कन्हैय्या कुमार यांनी लगावलाय.
अजित पवार गटाची बीडमध्ये जाहीर सभा

अजित पवार गटाची जाहीर सभा बीडमध्ये 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी या जाहीर सभेचं आयोजन केल आहे. ही सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी घेतली जाणार असल्याचं बोललं जातंय. मात्र, ही सभा बीडच्या विकासाची आणि सन्मानाची असेल असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळांसह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता ही सभा आयोजीत करण्यात आली.