NCP Support BJP: "आमच्या 7 आमदारांनी सांगितलं, भाजपाबरोबर जाणार नाही पण..."; पवारांनी सांगितलं BJP ला पाठिंबा देण्याचं कारण

Sharad Pawar on supporting BJP In Nagaland: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या राज्य सरकारला नागालँडमध्ये पाठिंबा दिल्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही गाजला.

Updated: Mar 10, 2023, 03:51 PM IST
NCP Support BJP: "आमच्या 7 आमदारांनी सांगितलं, भाजपाबरोबर जाणार नाही पण..."; पवारांनी सांगितलं BJP ला पाठिंबा देण्याचं कारण title=
BJP NDPP Government

Sharad Pawar On Supprting BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासंदर्भातील मुद्द्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. नाशिकमध्ये (Nashik) आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु आहे असं म्हणत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी नागालँडमधील सर्व पक्षांनी एकत्र येऊन नागा लोकांच्या प्रश्नासाठी काम करण्याचा ठराव केला. या ठरावाला आम्ही पाठिंबा दिला आहे, असं म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभेत गाजला मुद्दा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपा आणि एनडीपीपीच्या सरकारला पाठिंबा दिल्याचा मुद्दा गुरुवारी (9 मार्च 2023 रोजी) महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही गाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये "50 खोके नागालँड ओके हे चालतं का?" असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीवर टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी या टीकेला विरोध केला होता. दरम्यान याच मुद्द्यावरुन आज थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचाराला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा का दर्शवला याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं. नेमक्या कोणत्या कारणामुळे राष्ट्रवादीने पाठिंबा दिला हे सांगतानाच नागालँडचे मुख्यमंत्री हे भाजपाचे नाहीत, असंही पवार यांनी अधोरेखित केलं.

पवार नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसनं नागालँडमध्ये भाजपाला पाठिंबा दिला त्यावरुन राज्यात बरीच चर्चा सुरु आहे, असं म्हणत शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी, "आम्ही भाजपाला पाठिंबा दिला असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये जे केलं आहे ते पाहिल्यास त्या ठिकाणी कुठलाच पक्ष सत्तेबाहेर राहिलेला नाही. सगळे पक्ष एकत्र आले. त्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला की येथे नागा लोकांचे काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. तिथे एक काळ असा होता की नागालँण्डमधील नागा संघटना देशविघातक काही कार्यक्रम देत होते. त्यामुळे या सर्वांना एकत्र आणावं. या गोष्टी आपण कराव्यात असा निर्णय तिथल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. तिथले मुख्यमंत्री भाजपाचे नाहीत. त्यांनी सर्वांशी कॉनॅक्ट केला. आमच्या 7 लोकांनी सांगितलं आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही. मात्र ऐक्याच्या दृष्टीने काही पावलं टाकली जात असतील मुख्यमंत्र्यांकडून तर आम्ही नकारात्मक भूमिका घेणार नाही. आम्ही विरोधात जाणार नाही. त्यासाठी आमचं सहकार्य असेल यापेक्षा दुसरं काही त्यामध्ये नाही," असं उत्तर दिलं.