'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2018, 09:28 PM IST
'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत' title=

पुणे : महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं. 

राज ठाकरेंचा प्रश्न

२२ हजार कोटी मुंबई - बडोदा एक्सप्रेस हायवे, १ लाख १० हजार रुपयांची मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करायची घोषणा भाजपनं केली... मुंबई आम्हाला मिळाली नाही संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासूनची गुजरातची ही जखम भरून काढण्यासाठी, मुंबई बाजुला करण्याचं हे षडयंत्र आहे का? पटकन अहमदाबादला तुम्ही सकाळी पोहचलात... काय करायचं काय अहमदाबादला? ढोकळा, खाकरा खायचा? मुंबई स्वतंत्र करण्याचं षड़यंत्र आहे का? असा प्रश्न मांडताना राज ठाकरेंनी आपल्या मनातील भावनाही मोकळ्यापणे बोलून दाखवल्या.

पवारांचं उत्तर

बुलेट ट्रेनला आम्ही विरोध केला नाही... पण, करायचीच असेल तर चंद्रपूर - नागपूर - मुंबई - पुणे अशी महाराष्ट्राला एकसंघ करणारी किंवा दिल्ली-मुंबई अशी बुलेट ट्रेन करा... मुंबई-अहमदाबाद ट्रेन सुरू झाली तर अहमदाबादला कोण जाणार नाही, अहमदाबादमधून मुंबईत येतील... आणि मुंबईची गर्दी वाढेल, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. 

मुंबई - अहमदाबाद पहिल्या वर्गात बसणाऱ्या लोकांची संख्या पाहिली तरी या ट्रेनची गरज नाही असं अहवालात नमूद करण्यात आलंय. परंतु, असा डाव असला तरी कुणी वरून खाली उतरलं तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत, असंही पवारांनी आपल्या उत्तरात ठणकावून सांगितलं.

'अर्थकारणावर नियंत्रणाचा प्रयत्न'

मुंबई कुणीही हलवू मुंबई - पुणे म्हणजे काय तर देशाचं अर्थकारण... त्या अर्थकारणावर नियंत्रण ठेवण्याचं काम घटकांचा प्रयत्न असेल आणि त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसतोय... महाराष्ट्र अर्थकारणाच्या दृष्टीनं योग्य आहे... त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं हे 'षडयंत्र' दिसतंय, असं पवार यांनी भाजपच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्हं निर्माण केलंय. 

'जागतिक मराठी अकादमी'च्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमानिमित्तानं एक अनोखा योग जुळून आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचा आकर्षणाचा विषय ठरला. यावेळी शरद पवार यांच्या राजकीय, सामाजिक कार्यकिर्दीचा गौरवही करण्यात आला.