‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 29, 2024, 05:54 PM IST
‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण title=

Sharad Pawar Dinner Diplomacy : पुन्हा एकदा शरद पवार यांची डिनर डिप्लोमेसी पहायला मिळणार आहे.  बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. ‘गोविंदबागेत जेवायला या' असा निरोपच शरद पवार यांनी धाडला आहे. शरद पवार यांच्या या नित्रंत्रणामुळे राजकीय वर्तुळेत चर्चेला उधाण आले आहे.  

बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही

दरम्यान, बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही.  दोन मार्चला बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो रोजगार मेळावा होतोय. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.  राज्य सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे. शरद पवारांचं नाव मात्र या कार्यक्रमपत्रिकेत नाही. 

सुप्रिया सुळे यांनी अद्याप पत्रिकेत नाव असले तरी आपल्याला निमंत्रण नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलेय. हा कार्यक्रम विद्या प्रतिष्ठान ही संस्था शरद  पवार साहेबांनी स्थापन केलेली  आहे जर कार्यक्रमाला बोलावलं तर लोकप्रतिनिधी या नात्याने माझी  नैतिक जबाबदारी आहे असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

शरद पवार यांचे आमंत्रण पत्र

आपण शनिवार, दिनांक ०२ मार्च, २०२४ रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सौ. सुप्रिया सुळे याना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो, करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रीत करतो.

आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्विकार करावा.

दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्विकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. कळावे,

आपला, विश्वासू

(शरद पवार)

श्री. एकनाथ संभाजीराव शिंदे माननिय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

प्रतिलिपी - खालील मान्यवरांना विनंती कि, आपणास देखील सस्नेह निमत्रीत करीत असून कृपया निमंत्रणाचा स्विकार करावा.

१. श्री. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, माननिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

२. श्री. अजित अनंतराव पवार माननिय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

(शरद पवार)