'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Sharad Pawar Direct Dig At PM Modi: मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हणत शरद पवारांनी यंदाच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदी किती काळ अधिवेशनातील कामकाजामध्ये सहभागी झाले याबद्दलचा तपशील दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 23, 2024, 04:42 PM IST
'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला title=
जाहीर भाषणात शरद पवारांची टीका

Sharad Pawar Direct Dig At PM Modi: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी बारामतीमध्ये शुक्रवारी शेतकरी आणि कामगार मेळाव्याला हजेरी लावली. यावेळेस उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी एकदा 'शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो' असं म्हणाले होते हा संदर्भ देत शरद पवारांनी निशाणा साधला आहे.

पार्लमेंटमध्ये कधी भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात पण...

 शरद पवारांनी आपल्या भाषणा मोदींनी शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आल्याचं म्हटल्याची आठवण करुन दिली. मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर आज ते ज्या पद्धतीने काम करत आहेत तसली कामं त्यांना करु दिली नसती, असं शरद पवार म्हणाले. ' मात्र आज त्यांचे (मोदींचे) जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही,' असं पवारांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना पवारांनी, 'माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही,' असंही म्हटलं. "आज दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडतंय ते वेगळं घडतंय. मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत. बारामतीला आले होते, तिथे भाषण केलं,  "शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो." पार्लमेंटमध्ये कधी भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात. हे बोलणं ठीक आहे पण करतात काय? धोरणं काय? कोणते निर्णय त्यांनी घेतले. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पध्दतीने वापरली जाते," अशी टीका शरद पवारांनी केली.

कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार?

"तुम्हाला झारखंड नावाचं राज्य माहितीये का? झारखंड नावाचं राज्य आहे. आदिवासींचं राज्य आहे. मोदींविरुध्द भूमिका घेतली. तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी आहे. केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरूण मुख्यमंत्री झाला. त्यांची शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व बाहेरून लोक यायला लागले. चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत. कशासाठी? काही धोरणं त्यांनी आखली. धोरण आखण्यासाठी पार्लमेंटमध्ये जायचं असतं. आताच सुप्रियाने सांगितलं की, पार्लमेंटमध्ये आम्ही गेलो. आणि कामगारांचं धोरण याच्यावर चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण आखलं पाहिजे," असं शरद पवार म्हणाले.

नक्की वाचा >> '..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'

मोदी किती वेळ पार्लामेंटमध्ये आले?

"या निवडणुकीमध्ये आम्ही अधिक लक्ष घातलं आहे. याचं कारण मागील 10 वर्ष पार्लमेंटमध्ये तुम्हा लोकांच्या वतीने आम्ही काम करतो आणि तिथे आता मोदींचं राज्य आहे. मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पार्लमेंटच्या पहिल्या दिवशी मोदींचा फोटो तुम्ही पाहिला असेल. पार्लमेंटमध्ये जाताना त्याच्या दारापाशी साष्टांग दंडवत घालतात आणि त्याचा  सन्मान मी करतो हे देशाला दाखवतात. आताचं पार्लमेंटचं सेशन संपलं, ते सेशन एक महिन्याचं होतं. आणि त्या एक महिन्याच्या सबंध महिन्यामध्ये पंतप्रधान आमच्या सभागृहात कितीदा आले, किती वेळासाठी आले, तर आपल्याला आश्चर्य वाटेल, शनिवार रविवार सुट्टी असल्याचं सोडा, बाकीच्या 30 दिवसांपैकी एक दिवस पंतप्रधान सभागृहात आले आणि काही मिनीटांसाठी बोलले आणि निघून गेले," असं शरद पवार म्हणाले.

नक्की वाचा >> '..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'

त्यांना संविधान बदलायचं आहे

मोदी महिन्याभराच्या अधिवेशन काळात केवळ काही मिनिटांसाठी उपस्थित राहिल्याचा संदर्भ देत शरद पवारांनी, "याचा अर्थ हा आहे, ही जी संसदीय लोकशाही आहे त्यावर त्यांचा कितपत विश्वास आहे, हे त्यांनी दाखवलं. माझ्यासारख्याला काळजी ही वाटते की, एक भाजपचे खासदार आहेत. ते आहेत कर्नाटकातले. त्यांचं आडनाव आहे हेगडे आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की, हे मत तुम्ही आम्हाला द्या आणि याचं कारण हे मत तुम्ही आम्हाला दिलं आणि सत्ता आमच्या हातात आली तर मोदींना या देशाची घटना बदलायची आहे. म्हणजे त्यांच्या मनात काय आहे हे त्यानिमित्ताने स्पष्ट झालं. या देशाची घटना जो तुमचा अधिकार आहे तीच आम्ही बदलणार आणि त्यासाठीच तुम्ही आम्हाला मत द्या ही भूमिका घेणं याचा अर्थ लोकशाही संकटात येते याची स्पष्टता आता दिसते. म्हणून या निवडणुकीकडे बारकाईने पाहिलं पाहिजे," असं शरद पवार म्हणाले.