Pune Crime, Ganesh Marne arrested : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol murder case) याची 5 जानेवारी रोजी कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या प्रकरणातील आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच आता या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी (Pune Crime News)) अखेर अटक केली आहे.
नाशिक रोड येथून गणेश मारणेला अटक
मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे (Ganesh Marne) याने वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने गणेश मारणेचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पुणे पोलिसांना फ्री हँड मिळाल्यानंतर त्यांनी गणेश मारणेचा शोध घेतला अन् अखेर अटक केली आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. नाशिक रोड येथून गणेश मारणेला अटक करण्यात आली आहे.
शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींचा पाठलाग करत गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांच्या बेड्या ठोकल्या आहेत. शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने दहा पथके स्थापन केली होती. मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्यांनी घटनास्थळावर गणेश मारणेचे नाव घेतले होते, त्यामुळे हा गंभीर गुन्हा आहे, जामीन देता येणार नाही, असं न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, मोहोळ खुन प्रकरणात गुन्हे शाखेने साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे. तपासात गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झालंय.
गणेश मारणे कोण आहे?
पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गजानन मारणे आणि गणेश मारणे या दोन टोळ्या सक्रिय आहेत. हे दोघंही मुळशी तालुक्यातील आहेत. पुण्यातील शुक्रवार पेठेतील अनिल मारणेचा खून केला होता. मोहोळचे गुन्हेगारी विश्वातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी गणेश आणि त्याचा साथीदार सचिन पोटे यांनी मोहोळच्या खुनाचा कट रचला होता. अशातच आता शरद मोहोळ हत्या प्रकरणात गणेश मारणेच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.