यवतमाळमधील कोरोना रुग्णांचे मरकज कनेक्शन

कोरोना पॉझिटिव्ह आठ पैकी सातजण अन्य राज्यातील

Updated: Apr 9, 2020, 01:05 PM IST
यवतमाळमधील कोरोना रुग्णांचे मरकज कनेक्शन title=

श्रीकांत राऊत, प्रतिनिधी :  यवतमाळमध्ये कोरोनाच्या तीन रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर कोरोनाचे नवे आठ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या आठही जणांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर आलं आहे.

ट्रव्हल कंपनीच्या माध्यमातून दुबईला पर्यटनासाठी गेलेल्या यवतमाळच्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. पण हे सर्वजण बरे होऊन घरी पोहचले आणि काही दिवसांतच यवतमाळमध्ये पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात भरती असलेल्या आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या आठपैकी सात जण दुसऱ्या राज्यातील असून ते दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या मरकजशी संबंधित आहेत. तर यवतमाळमधील एक जण त्यांच्या संपर्कात आल्यानं त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण ६५ जण भरती आहेत. त्यापैकी ५२ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आणि ४३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ज्या ८ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, त्यापैकी चार जण उत्तर प्रदेशचे आहेत. तर दोन पश्चिम बंगालचे आणि एक दिल्लीचा आहे. सातही जण तबलिगीशी संबंधित आहेत. आणि यवतमाळचा आठवा रुग्ण त्यांच्या संपर्कात आला होता.

मरकजहून आल्यानंतर हे सर्वजण मशिदीत आणि यवतमाळमधील काही जणांकडे थांबले होते. या आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर यवतमाळमधील मालानी बाग, मोमीनपुरा, गुलमोहर पार्क हे भाग सील करण्यात आले आहेत. या भागात निर्जंतुकीकरण करून २५ जणांची टीम या भागातील नागरिकांचे सर्वेक्षण करत आहे. या भागात कुणाला कोरोनाची लक्षणं आहेत का याची तपासणी केली जात आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सँम्पल आला चाचणीसाठी पाठण्यात येणार आहेत.  

 

यवतमाळमधील कोरोना स्थितीची माहिती देताना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले की, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या घराशेजारील भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या घरातील इतर कुटुंबीय, ते ज्यांच्या संपर्कात आले असतील असे नातेवाईक व इतर संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.