वाल्मिक जोशी, जळगाव : गोदावरी महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहे. परंतु आवश्यक ती इंजेक्शन आणि औषधी न मिळाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित औषधांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी रुग्णांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात २५ ते ३० रुग्ण दाखल आहे. यापैकी अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, मात्र रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणारे अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहे.
प्रशासनाने रुग्णालयाला आवश्यक तितक्या इंजेक्शनचा पुरवठा करावा अशी मागणी रुग्णांनी स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर इंजेक्शन न मिळाल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये बुरशी पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रुग्णांची परिस्थिती पाहता लवकरात लवकर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 72 रुग्ण आहेत. इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे रुग्णालयाला इंजेक्शन देता येत नाहीयेत. पण जसा शासनाकडून पुरवठा होईल तसं रुग्णालयांना लगेचच ते पुरवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.