लॉकडाऊन काळात डोंबिवलीकर रमले पुस्तकात, सकारात्मक राहण्याचा शोधला मार्ग

टीव्ही आणि सोशल मीडियाला कंटाळलेले डोंबिवलीकर पुस्तकात रमले.

Updated: Jun 6, 2021, 06:20 PM IST
लॉकडाऊन काळात डोंबिवलीकर रमले पुस्तकात, सकारात्मक राहण्याचा शोधला मार्ग title=

आतिष भोईर, डोंबिवली : डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. त्याचसोबत इथली वाचन संस्कृती टिकवण्याचे काम हे पै फ्रेंड्स लायब्ररी गेले ३५ वर्षा पासून करत आहे. त्यांच्याकडे साडेतीन लाखाहून अधिक पुस्तके आणि वीस हजारापेक्षा अधिक वाचक सदस्य आहेत.

डोंबिवलीची ओळख ही शं. ना. नवरे, पु. भा. भावे यांसारखे ज्येष्ठ साहित्यिकामुळे देखील आहे. याच साहित्यिकांनी डोंबिवलीला साहित्य व कलेवर प्रेम करायला शिकवले. डोंबिवलीला वाचन संस्कृतीचे वरदान आहे.

कोविड काळात वाचकांना जास्तीत जास्त पुस्तक वाचता यावीत यासाठी पै लायब्ररीने प्रत्येक सभासदाला एकावेळी सहा पुस्तके दिली. सर्वत्र लॉकडाऊन सदृश परिस्थिती असल्याने घरी राहून टीव्ही आणि सोशल मीडियाला कंटाळलेले डोंबिवलीकर पुस्तकात रमले. त्यामुळे लॉकडाऊन काळात डोंबिवलीत वाचकांची संख्या वाढली असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीची संस्थापक पुंडलिक पै यांनी सांगितले.

सोशल मीडियावर आणि टीव्हीवर सुरु असलेल्या नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी डोंबिवलीकरांनी मार्ग शोधला. पुस्तक हे माणसाचं ज्ञान तर वाढवतंच पण त्याला सकारात्म राहण्यासाठी तसा दृष्टीकोन देखील देतो. त्यामुळे कोरोना सारख्या काळात पुस्तक हे डोंबिवलीकरांसाठी सकारात्मक राहण्याचं साधन बनलं.