बैठकीला जात असतानाच कॉंग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्याच्या झटक्याने निधन; नाशिकमध्ये शोककळा

Jaiprakash Chhajed : नागपूर येथे बैठकीला निघालेले असतानाच माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली

Updated: Jan 11, 2023, 09:12 AM IST
बैठकीला जात असतानाच कॉंग्रेस नेत्याचे हृदयविकाराच्याच्या झटक्याने निधन; नाशिकमध्ये शोककळा title=

Nashik News : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड (Jaiprakash Chhajed) यांचे निधन झाले. मंगळवारी रात्री जयप्रकाश छाजेड यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. छाजेड यांचे वयाच्या 75व्या वर्षी नाशिकच्या (Nashik) खासगी रुग्णालयात हृदय विकाराच्याच्या झटक्यामुळे (Heart Attack) निधन झाले. मंगळवारी रात्री छाजेड हे नागपूर (Nagpur) येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

प्रकृती बरी नसल्याने छाजेड यांच्या कुटुंबियांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर छाजेड नागपूरसाठी निघाले होते. मात्र त्याआधीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान जयप्रकाश छाजेड यांचा मृत्यू झाला. छाजेड यांच्या मृत्यूनंतर नाशिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. छाजेड यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूरला बैठकीसाठी गेलेले कॉंग्रेस कार्यकर्ते नाशिकला परतले आहेत.

दरम्यान, जयप्रकाश यांच्यामागे त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता नाशिकच्या अमरधाममध्ये  छाजेड यांच्यावरअंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून जयप्रकाश छाजेड यांचा नाव लौकिक होता. बऱ्याच काळापासून छाजेड यांचे कुटुंब कॉंग्रेससोबत जोडले गेलेले होते. युवक काँग्रेसपासून छाजेड यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर जयप्रकाश छाजेड यांनी कॉंग्रेसच्या नाशिक शहर आणि राज्य पातळीवरील अनेक महत्त्वाची पदे भूषवली. तसेच जयप्रकाश छाजेड यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. छाजेड हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जवळचे सहकारी होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाली होती.