धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू

प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 23, 2024, 10:53 AM IST
धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू title=

अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ एक मोठी घटना घडली आहे. बुधवारी या नदीमध्ये 2 जण बुडाल्याची माहिती होती. यामधील एका व्यक्तीच्या शोधण्यासाठी गुरुवारी सकाळी SDRF च्या पथकाला बोलण्यात आलं होतं. मात्र यावेळी प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

तिघांचा मृत्यू, एकाचा शोध सुरु

प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी गेलेल्या SDRF पथकाची बोट बुडाली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचले होते.

इंदापूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांवर काळाचा घाला..

इंदापूरमध्ये उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जण बेपत्ता झाले होते. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांवर काळाने घाला घातला. पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सहा जणांपैकी 5 जणांचा मृतदेह सापडल्याची माहिती आहे. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३० वर्षे ), कोमल गोकूळ जाधव (वय २५ वर्षे ), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय तीन वर्षे,) या संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी मिळाली आहे. याशिवाय कुगाव गावातील अनुराग उर्फ गोल्या न्यानदेव अवघडे (वय 20) ह्या बोट चालकाचाही मृत्यु झाला आहे. तसंच मात्र गौरव  धनंजय डोंगरे (वय 25 वर्षे) हा बेपत्ता युवक अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफचे जवान या प्रकरणात शोध घेत आहेत.