दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु

दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. 

Updated: Jan 27, 2021, 11:58 AM IST
दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु  title=

मुंबई / कोल्हापूर / औरंगाबाद : दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या (Maharashtra) अनेक शाळा (Schools) सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. राज्य सरकारच्या आदेशानंतर आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद, ठाणे ग्रामीण, नाशिक जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात. तर औरंगाबादमध्ये सहावी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र पुणे, नागपूर, मुंबईतल्या शाळा अद्याप सुरू नाहीत. 10 महिन्यांनी आजपासून रायगड जिल्ह्यात 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू झालेत. कोरोनाच्या नियमांचं  पालन करत वर्ग भरवण्यात येतायत. अमरावतीच्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्यात.

रायगडात शाळा सुरू झाल्याने समाधान

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोरोना काळानंतर तब्बल 10 महिन्यांनी आजपासून रायगड जिल्ह्यात 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू झालेत. कोरोनाच्या नियमांचे पालन करत वर्ग भरवण्यात येत आहेत. शाळा सुरू करताना गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय प्राधान्याने घेण्यात येतायत. रायगड जिल्ह्यात 894 शाळा असून 31 हजार 912 इतके विद्यार्थी शाळेत येणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काही शाळांमध्ये पालक सभा न झाल्याने हे वर्ग सुरू झालेले नाहीत. १० महिन्यांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यानी शाळा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

कोल्हापूर । शाळा पुन्हा गजबजल्या

कोल्हापुरातही तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आजपासून शाळा पुन्हा गजबजल्या. मात्र जिल्ह्यातल्या सर्वच शाळा सुरू झाल्या नसून काही शाळा अद्याप बंद आहे...मात्र ज्या शाळा सुरू झाल्या त्यांनी कोरोना आचारसंहितेचं पालन करत शाळा सुरू केल्या आहेत. सोशल डिस्टन्स पाळत, प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर देत, पालकांचं समंतीपत्र घेत शाळा सुरु करण्यात आल्यात. सेंट जेवियर  हायस्कूलचे विद्यार्थीही दहा महिन्यानंतर शाळेत येताना नियमांचं पालन करताना दिसत आहेत. कोल्हापूरातल्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यानी आनंद व्यक्त केला आहे.

सातारा जिल्ह्यातील 5 ते 8 वी इयत्तेचे वर्ग आज पासून सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १० महिन्यापासून या शाळा बंद होत्या मात्र सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेत या शाळा सुरु झाल्यात. ९ ते १० चे वर्ग नोव्हेंबर महिन्यात सुरु झाले होते मात्र त्या नंतर तब्बल २ महिन्या नंतर ५ ते ८ वी चे वर्ग आज सुरु झालेत.  

औरंगाबादेत विद्यार्थ्यांना उत्सुकता

औरंगाबादेत सुद्धा आजपासून 6 ते 8 वीचे वर्ग सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेच्या या पहिल्या दिवसाची उत्सुकता आहे. रांगेत उभं राहून सॅनिटायझर लावून, ताप आहे की नाही हे तपासून विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात येत आहे. शाळेत येण्यासाठी पालकांचे संमती पत्र गरजेचे आहे. 

अमरावतीत विद्यार्थ्यांचे स्वागत

अमरावती जिल्ह्यातील 5 वी 8 वीपर्यंतच्या 670 शाळा आजपासून सुरू झाल्या. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी बहुउद्देशीय विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाबाचं फुल देऊन स्वागत करण्यात आलं. सुरुवातीला विद्यार्थ्यांचं तापमान मोजण्यात आलं, हातावर सॅनिटायझर देण्यात आलं. मात्र मोजकेच विद्यार्थी शाळेत हजर झाले. त्यामुळे गुरुजी हजर तर विद्यार्थी गैरहजर असं म्हणायची वेळ आली आहे.
 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x