Jaisalmer Fort : भारतातील अनेक राज्यात गड किल्ले आहेत. हे किल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत. भारतातील जवळपास सर्वच किल्ले हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनली आहेत. जवळपास कोणत्याच किल्ल्यावर कुणी राहत नाही. मात्र, भारतात एक असा किल्ला आहे जिथे तब्बल चार हजार लोक राहतात. जाणून घेऊया हा किल्ला कोणता आणि हा किल्ला कोणत्या राज्यात आहे.
भारतातील सर्वात राजेशाही राज्य अशी राजस्थानची ओळख आहे. राजस्थान हे पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते. अलिशान राजवाडे आणि भव्य किल्ले ही किल्ले ही राजस्थानची शान आहे. राजस्थानमध्येच भारतातील एकमेव किल्ला आहे जिथे आजही तब्बल चार हजार लोक राहतात. या किल्ल्याचे नाव आहे जैसलमेर.
अनेक वर्ष भारतावर राजे महाराज्यांनी राज्य केले. या किल्ल्यांमध्येच राजे महाराजांचे वास्तव्य होते. आता मात्र, हे किल्ले राष्ट्रीय वारसा बनले आहेत. इथं नागरिकांना राहण्याची परवानगी नाही. मात्र, जैसलमेर किल्ला याला अपवाद आहे. जैसलमेर हे एक किल्ल्याचे शहर आहे. जैसलमेर किल्ल्याला ‘सोनार किल्ला’ असेही म्हणतात. हा भारतातील एकमेव ‘लिविंग फोर्ट’ आहे. कारण, किल्ल्याच्या आत जवळपास 4000 लोक राहतात.
राजा रावल जैसल यांनी 1156 मध्ये हा जैसलमेरचा किल्ला बांधला होता. मेरूच्या टेकडीवर वसलेले या किल्ल्याला त्रिकुटा गड असेही म्हणतात. या गडाने भारत देशाच्या अनेक मोठ्या लढाया पाहिल्या आहेत. हा जगातील सर्वात मोठा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पिवळ्या आणि सोनेरी वाळूच्या दगडाने बांधलेला आहे. हा किल्ला राजस्थानी कलाकृतीचा एक उत्कृष्ट रचना आहे. हा किल्ला 1,500 फूट (460 मीटर) लांब आणि 750 फूट (230 मीटर) रुंद आहे.
जैसलमेर जिल्ह्यातील लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश म्हणजेच जवळपास 4 हजार लोक अजूनही या किल्ल्यात राहतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक येथे कोणतेही शुल्क न भरता राहतात. या किल्ल्यात राजमहाल, जैन मंदिर आणि लक्ष्मीनाथ मंदिर आहे. ही राजस्थानमधील लोकप्रिय पर्यटन स्थळं आहेत.