शाळांमध्ये नाही घुमणार 'हजर ssss' चा आवाज

 'हजर गुरुजी', 'यस सर'चा आवाज देखील बंद होणार....

Updated: Dec 25, 2019, 11:16 AM IST
शाळांमध्ये नाही घुमणार 'हजर ssss' चा आवाज   title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : आता विद्यार्थ्यांचं मस्टर इतिहास जमा होणार आहे. 'हजर गुरुजी', 'यस सर'चा आवाज देखील बंद होणार... शाळेच्या महत्वाच्या आठवणींपैकी एक आठवण आता कालबाह्य होणार आहे. कारण आता शाळेत बायोमेट्रिक हजेरी लावली जाणार आहे. 

आतापर्यंत शाळेत हजेरी घेण्याची जुनी पद्धत होती. मुलं हजर गुरुजी किंवा यस सर म्हणायची... मात्र आता ही पद्धत आता बंद होणार आहे. कारण या पुढं हजेरी नोंदवतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचा वापर करावा लागणार आहे.  केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांची  हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत..  मुख्य बाब म्हणजे शैक्षणिक संस्थांना बायोमेट्रिक हजेरीसाठीच्या यंत्रणेचा खर्च करावा लागणार आहे.

या पद्धतीनं हजेरी घेतली तर वेळ जाणार हे निश्चित, एका शाळेत हजारांवर मुलं असतात, ही मुलं रांगेत जरी लागली तरी सर्व विद्यार्थ्यांची फक्त हजेरीच घ्यायला 4 तास लागतील, शाळा नक्की किती बायोमेट्रीक मशीन बसवणार यावरही मर्यादा असेलच, बोगस विद्यार्थी हजेरी लावणा-या शाळांसाठी नक्कीच हा धोका असेल, मात्र ज्या शाळेत विद्यार्थीसंख्या जास्त असेल, त्यांना आता फक्त हजेरीसाठी किमान तास दोन तास राखून ठेवावे लागतील हे निश्चित..

बायोमेट्रिक हजेरीमुळे शाळांची डोकेदुखी वाढणार आहे. एका शाळेतली बायोमेट्रिक हजेरी पूर्ण करण्यासाठी चार तासांचा वेळ जाईल असा दावा संस्थाचालकांचा आहे. संस्थाचालक आणि शिक्षक आमदारांनी या निर्णयाला विरोध केला आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे बोगस पटसंख्या दाखवता येणार नाही. यामुळं सरकारच्या अनुदानाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. पण या नव्या पद्धतीमुळे हजेरीची पूर्वापार चालत आलेली प्रथा कायमची इतिहासजमा होणार आहे.