च्युईंगमचा नाद जीवावर बेतला, पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या नाहीतर....

शाळा सुटल्यावर तो च्युईंगम खात मित्रांसोबत निघाला... पण घरी परतलाच नाही

Updated: Dec 3, 2021, 10:50 PM IST
च्युईंगमचा नाद जीवावर बेतला, पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या नाहीतर.... title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : च्युईंगम खाण्याचा नाद एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात ही दुर्देवी आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. 

शाळकरी जीवनात अनेक विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्किटबरोबरच च्युईंगम खाण्याची आवड असते. पण याच सवयीने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्य पांढरट गावात राहणाऱ्या विद्यार्थ्याचा जीव गेला. 

नववीत शिकणारा उमेश पाटील हा विद्यार्थी दुपारी शाळा सुटल्यानंतर आपल्या मित्रांबरोबर रिक्षाने घरी परतत होता. प्रवासात त्याने आपल्या मित्रांबरोबर च्युईंगम खाल्लं. पण च्युईंगम चघळत असतानाच ते त्याच्या घशात अडकलं. त्याने च्युईंगम काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आलं नाही. 

च्युईंगम श्वास नलिकेत अडकल्याने उमेशला श्वास घेणं कठिण होऊ लागलं. मित्रांनी त्याला तातडीने भडगाव इथल्या दवाखान्यात नेलं. पण तो पर्यंत खूप उशीरा झाला होता. वाटेतच उमेशचा मृत्यू झाला.

उमेशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण भडगाव तालुक्यात शोककळा पसरली. आपली मुलं काय खातात, त्यांना कसल्या सवयी आहेत, याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया लाडकुबाई विद्या मंदिराच्या मुख्याधापिका वैशाली पाटील यांनी दिली आहे.