Satara Earthquake : साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला असून त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.. संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर होता. सुदैवानं यात कोणतंही नुकसान झालं नाही.
प्राथमिक माहितीनुसार कोयना धरण (Koyana Dam) परिसरात हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पण, या भूकंपामुळं कोयना धरण आणि परिसराला मात्र कोणताही धोका नसल्याची माहिती व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आली आहे. कोयना धरण आणि नजीकच्या परिसरामध्ये वारंवार भूकंपाचे हादरे जाणवतात पण, नागरिकांनी मात्र यास न घाबरण्याचं आवाहन सध्या यंत्रणा करताना दिसत आहेत.
सातारा आणि जवळपासच्या भागांमध्ये हिवाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पण, सध्या इथं नुकत्याच येऊन गेलेल्या भूकंपामुळं भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यंत्रणांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देत सध्या भीती वाटण्याचं कारण नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. ज्यामुळं नागरिकांना किमान दिलासा मिळताना दिसतोय.