Maharashtra Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात चढ उतार जाणवत असल्यामुळं याचे थेट परिणाम आता राज्यातील तापमानावरही दिसू लागले आहेत. गेल्या आठवड्याभरात ज्या थंडीनं राज्यातील बहुतांश भागांना किंबहुन मुंबईलाही हुडहूडी भरवली होती तिच थंडी आता मात्र तिचा प्रभाव कमी करताना दिसत आहे. थोडक्यात महाराष्ट्रातून थंडी सध्या कमी होत असून, पुढील 48 तासांमध्ये ती आणखी कमी होण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरीही या आठवड्याच्या शेवटापर्यंत मात्र थंडीच्या परतीचा मुहूर्त निश्चित आहे हेसुद्धा नाकारता येत नाही.
मागच्या आठवड्यापासून राज्याच्या किमान तापमानात सातत्यानं घट नोंदवण्यात आली होती. पण, रविवारपासून मात्र हे चित्र बदलू लागलं आणि किमान तापमानाच वाढ होण्यास सुरुवात झाली. नाशिक, जळगावसह धुळ्यातही जिथं तापमान 10 अंशांच्या खाली उतरत होतं तेच तापमान आता 8 अंशांच्याही पुढं गेलं आहे. कुठे हा आकडा 15 अंशांवर आला आहे. ज्यामुळं राज्यातून थंडीनं काही दिवसांसाठी दडी मारल्याचं आता स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही ही थंडी मोठ्या सुट्टीवर गेली नसून बुधवारपासून पुढं आठवड्याच्या अखेरीपर्यंत थंडीचा कडाका पुन्हा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्याच्याच्या घडीला महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोणतेही वारे किंवा तत्सम प्रणाली सक्रिय नसून, उत्तरेकडून येणारे वारे तितके राज्याच्या हवामानावर परिणाम करताना दिसत आहेत. हिमालयाच्या दिशेनं येणाऱ्या शीतलहरी सध्या दिल्ली, मध्य प्रदेशावर तुलनेनं अधिक परिणाम करताना दिसणार असून 48 तासांनंतर त्यांचा राज्यावरही परिणाम दिसण्यास सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामुळं विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी मुंबईत पुन्हा थंडीचं वातावरण पाहायला मिळू शकतं.
स्किईंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुलमर्ग आणि एकंदर पृथ्वीवरील नंदनवन अशी ओळख असणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. काश्मीरच्या डोंगराळ भागांना असणारी हिमवृष्टीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, आता इथं नव्यानं हिमवर्षावास सुरुवात झाली आहे.
काश्मीरमधील गुरेज खोरं, गुलमर्ग, जोजिला पास, बांदीपोरासह खोऱ्यातील अनेक भागांवर बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी उघडी पडलेली मातीची मैदानं आणि पर्वतशिखरं आता मात्र बर्फानं अच्छादून गेली आहेत. त्यामुळं काश्मीर सफरीवर आलेल्या पर्यटकांचा आनंदही द्विगुणित झाला आहे. पुढील काही दिवसांपर्यंत हवामानाचं असंच चित्र काश्मीरसह उत्तर भारतातील इतरही राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.