तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील पुसेगावमध्ये शनिवारी रात्री एक थरारक प्रसंग घडला. एका व्यक्तीने थांबलेली कार पाहून त्यात घुसून महिला, मुलांकह कार हायजॅक केली. पण गाडीतील महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधनाने तीने आरोपीच्या तावडीतून आपली आणि मुलांची सुटका केली. गाडी पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलं आहे.
नेमकी घटना काय?
वकील असलेल्या जयश्री गोरे आणि त्याचे पती महेश गोरे आपल्या चार महिन्याचा लहान मुलगा, 8 वर्षाची मुलगी, भाची आणि भावोजी यांच्यासह कामानिमित्त शिखर शिंगणापूर इथे गेले होते. रात्री 11.55 वाजण्याच्या सुमारास ते पुसेगाव इथं आल्यानंतर तहान लागल्याने पाणी घेण्यासाठी जयश्री याचे पती महेश आणि भावोजी हे दोघेही खाली उतरले.
कारमध्ये जयश्री गोरे या ड्रायव्हर सीटलगत बसल्या होत्या आणि त्यांच्या मांडीवर त्यांचं लहान बाळ होतं. तर मागे मुलगी आणि भाची बसली होती. यावेळी अचानक कारमध्ये एक तरुण शिरला आणि त्याने गाडीतील महिला, मुलांसह जोरात गाडी पळवायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जयश्री गोरे गोंधळल्या. पण त्यांनी प्रसंगावधान दाखवत तान्ह्या बाळासह आरोपीशी झुंज दिली.
जयश्री गोरे यांनी लाथाबुक्क्यांनी आरोपीला विरोध केला. जयश्री गोरे यांचं आक्रमक पवित्रा पाहून आरोपीही घाबरला. त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका लाकडाच्या धिगाऱ्यावर आदळली. आरोपीने तिथेच गाडी सोडून पलायन केलं. हा सगळा थरार 10 मिनिटे सुरू होता. चालत्या गाडीत झालेल्या झटापटीत 4 महिन्यांच्या बाळासह जयश्री गोरेही किरकोळ जखमी झाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुसेगाव पोलिसांनी रात्रीच सर्च ऑपरेशन राबवत संशयित अभिजित फडतरे याच्या मुसक्या आवळल्या. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे