Sanjay Raut On Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election 2024) आता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही बाजूकडून बैठकीचा धडाका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता महायुतीला मोठा धक्का बसलाय, असं म्हटलं जातंय. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संपूर्ण प्रकरणावर मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले संजय राऊत?
राज्याच्या राजकारणात विष पेरण्याचं काम कोणी केलं असेल तर ते भाजपने केलं आहे. आज तुम्ही 23 वरून 7 वर आला आहात. विधानसभा कधीही घ्या जनता त्यांना खाली खेचेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यावेळी महाविकास आघाडी 185 जागा जिंकणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नितिश बाबू आणि चंद्रबाबू यांना देश ओळखतो, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की सरकार टिकणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन योगी आदित्यनाथ यांचा बळी करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस हे नक्राश्रू काढत आहेत. केंद्रातील मोदी सरकार टिकणार नाही. त्यांनी लवकरात लवकर शपथ घ्यावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकार बनवण्यासाठी येत्या 7 जूनला दावा करणार आहे. एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांची बैठक आज दिल्लीत पार पडली. त्यात एनडीएचा नेता निवडण्यासाठी 7 जूनला पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड होईल, त्यानंतर सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींकडे दावा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
दरम्यान, सामना अग्रलेखातून राऊतांनी मोदी, शाहा, फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. देशाच्या जनतेने अहंकारी मोदी आणि अमित शाहांना निरोप दिला. एनडीएचे बहुमत हे टेकूवरचे आहे, ते टेकूही डळमळीत आहेत. जनतेनं मोदी, अमित शाहांचा अहंकाराचा गाडा रोखलाय. शिवसेना-राष्ट्रवादी फोडण्याने महाराष्ट्रात एकतर्फी विजय मिळवता येईल या भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला. अजित पवारांनी अनेक मतदारसंघांत धमक्या दिल्या, दहशत केली. फडणवीसांनी अनाजीपंतांचे राजकारण केले. या सगळ्या कारस्थानांचा पराभव महाराष्ट्राने केल्याची टीका राऊतांनी केलीय.