"दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा"; विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut : दिल्लीत आपला जे यश मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated: Dec 8, 2022, 10:31 AM IST
"दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा"; विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन संजय राऊतांचा आरोप title=

Assembly Election Result 2022 : गुजरात आणि हिमालच प्रदेश विधानसभा निवडणुकींचा निकाल आज जाहीर होणार आहे. गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपची (BJP) सत्ता आहे. मात्र आम आदमी पक्षही (आप) दोन्ही राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपने (AAP) एकहाती सत्ता मिळवलीय. त्यामुळे या दोन्ही राज्यात आपला किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आप आणि भाजपचे साटलोटं असल्याचे म्हटले आहे.

"दिल्लीत भाजपच्या 15 वर्षांची सत्ता आपने खेचून घेतली. मतविभागणी झाली नसती तर आपला आणखी चांगला विजय मिळवता आला असता. पण तरीही आपला जे यश मिळालं आहे ते कौतुकास्पद आहे. 15 वर्षाची सत्ता खेचून घेणे सोपे नाही," असे संजय राऊत म्हणाले.

हिमाचलमध्ये भाजपला संघर्ष करावा लागतोय

"गुजरातमध्ये आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर अटीतटीची लढत झाली असती. पण दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा असं काही तर झालं असावं अशी लोकांमध्ये संख्या आहे. हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस चांगली लढत देत आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले तर दिल्ली हातातून गेलं आहे. हिमाचलमध्ये संघर्ष करावा लागतोय," असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"गुजरातमधल्या विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन करतो. अजूनही हिमाचलमध्ये कॉंग्रेस येईल असे लोकांना वाटत आहे. देशांच्या पुढील निवडणुकांसाठी हे आशादायी चित्र आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येऊन मतविभाजणी टाळलं आवश्यक आहे. मतभेद दूर ठेवून एकत्र लढाई केली तर 2024 मध्ये देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. जर सर्व एकत्र येऊन लढले तर लोकसभेमध्ये गुजरातमध्ये परिवर्तन होईल," असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.