पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? जीवाला धोका असल्याचं स्वप्ना पाटकर यांचं ईडीला पत्र

पत्राचाळ प्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं असून गंभीर आरोप देखील केले आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 31, 2024, 01:30 PM IST
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ? जीवाला धोका असल्याचं स्वप्ना पाटकर यांचं ईडीला पत्र title=

Patra Chawl Fraud Case : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत हे दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकर यांनी आरोप केला आहे.त्याचबरोबर आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं आहे. स्वप्ना पाटकर यांच्या आरोपानंतर आता पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली होती. एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर सर्वात प्रथम उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यावर मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात संजय राऊत यांना 9 नोव्हेंबरला जामीन मिळाला होता. परंतु या प्रकरणात आता संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे.

स्वप्ना पाटकर यांचा आरोप काय? 

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी अतिरिक्त संचालक आणि ईडी यांना एक पंत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये स्वप्ना पाटकर यांनी बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यासाठी धमकी देखील दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. 

त्याचबरोबर पत्राचाळ प्रकरणाच्या तपासादरम्यान दिलेली सर्व विधाने बदलण्यासाठी देखील माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचं स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. एका पत्रावर सही न केल्यास बलात्कार करण्याची आणि त्याचबरोबर शरीराचे तुकडे करुण्याची धमकी आपल्याला कॉलवर मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.