सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात ही बैलगाडा शर्यत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणेबैलगाडी शर्यत जिंकणारया बैल मालकाला चक्क 1 बीएचके फ्लॅट मिळणार आहे.
महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचे सांगलीच्या कासेगावमध्ये आयोजन करण्यात आले आहे. आता पर्यंत बैलगाडी विजेत्याला थार गाडी आणि लाखोंचे बक्षीस देण्यात आली आहेत. मात्र कासेगावमध्ये आयोजित जयंत केसरी बैलगाडी स्पर्धेतील विजेत्यास चक्क वन बीएचके फ्लॅट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. आता या स्पर्धेची महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कासेगाव येथील शरद लाहीगडे फाउंडेशनकडून 17 फेब्रुवारी रोजी या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडीला सात आणि पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीतील इतिहासातील हे सर्वात मोठे बक्षीस असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यातून 200 हुन अधिक बैलगाडी स्पर्धक सहभागी होणार आहे. या बैलगाडा स्पर्धेसाठी 10 एकरांवर मैदान तयार करण्यात आले आहे. त्याच एक लाख प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती शरद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी दिली आहे.
"शरद लाहीगडे फाउंडेशन हे जयंत पाटील यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाने चालत आहे. जयंत पाटील यांच्या नावाने जयंत केसरी ही बैलगाडा शर्यत गेल्या वर्षी सुरु केली. पहिल्या पर्व उत्कृष्ट आणि योग्य नियोजनात पार पाडलं आहे. गेल्या वर्षीच आम्ही ठरवलं होतं की दुसरं पर्व हे आगळं वेगळं असेल. शेतकरी राजाला चांगले दिवस आले पाहिजेत आणि गोसंवर्धन झालं पाहिजे म्हणून आम्ही या जयंत केसरी मैदानाला सुरुवात केली. महाराष्ट्रात मोठ्या स्पर्धा झाल्या. पण आमच्या स्पर्धेत वन बीचएचके फ्लॅट देण्यात येणार आहे. या वस्तूचे मुल्य दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ही गोष्ट देण्यामागे आम्ही खूप विचार केला. या वस्तूमुळे शेतकऱ्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हे घर भाड्याने दिलं तरी त्याला सात हजार भाडे मिळू शकते. 20 लाखांचा फ्लॅट असला तरी त्याची किंमत 25 लाखांपर्यंत वाढू शकते," अशी माहिती शरद लाहीगडे फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल लाहीगडे यांनी सांगितले.