Pune Crime News : कोरोनामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन झाला. या कालावधीत अनेक जण कर्जबारी झाले. कर्जबाजारी झालेल्या नागरिकांचे कर्ज फेडून टाकतो असे आमिष दाखवत चेन्नईच्या एका महाशयाने पुण्यातील 200 हून अधिक लोकांना 300 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime News).
फसवणुकीचा हा सर्व प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरू होता. यातील मुख्य आरोपी सेल्वाकुमार नडार हा मूळचा चेन्नईचा आहे. पण, गेल्या अनेक वर्षांपासून बायको आणि मुलासह पुण्यातील कोंढवा भागात राहत होता. नडार ने पुणे पोलिस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या एका मॉल मध्ये एक ऑफिस भाड्याने घेतले होते. या ठिकाणी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या नावाने त्याने एक ऑफिस सुरु केले होते. कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक जणांना कर्ज फेडण्यासाठी पैसे नव्हते किंवा ज्यांना कर्ज परत करायचे आहे अशा लोकांना नडार आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे तसेच तुमचे सगळे कर्ज फेडू असे आमिष दाखविले.
गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकादारांना दिला जायचा तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करुन दिल्यास काही हप्ते फेडले जायचे.
नडार ने एकाच व्यक्तीच्या नावाखाली कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 9 बँकांकडून कर्ज घेतले. अनेक महिने नडार ने गुंतवणूकदारांचे कर्जाचे हफ्ते फेडले सुद्धा पण जानेवारी पासून हफ्ते गेले नसल्यामुळे नागरिकांना या संस्थेचा संशय आला आणि त्यासाठी काही जण एकत्र आले आणि त्यांनी पुण्यात कार्यालयावर जायचे ठरवले. कार्यालयवर जाताच त्यांना तेथे कुलूप दिसले आणि नडारचा फोन सुद्धा बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही जणांनी एकत्र येत पोलिसात धाव घेतली. यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आय टी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक जणांना नोकरी गमवावी लागली होती. अशाच आय टी मधील काम करणाऱ्या लोकांना नडार ने त्याच्या रडारवर ठेवले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार गुंतवणूकदारकडूनआत्तापर्यंत 200 हून अधिक जणांची अशीच फसवणूक झाली आहे. याचा आकडा देखील 300 कोटी रुपयांचा घरात आहे.