सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेवर दरोडा पडला आहे. या दरोड्यात 25 लाखाची रोकड चार अज्ञात चोरट्यांनी लुटली. यासाठी अनोखी शक्कल चोरट्यांनी अवलंबलेली दिसली. बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत चोरट्यानी हे कृत्य केले. रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळी (ता. तासगाव) च्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी आपल्या दुचाकीवरून तासगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली. ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण आपल्या दुचाकीवरून विसापुरकडे निघाले होते. दरम्यान, चोरटे या दोघांच्या पाळतीवर असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापुरकडे जात असताना चोरट्यानी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केल्याचे समोर येत आहे. दोन दुचाकीवरून चौघा चोरट्यानी पाठलाग करून तासगाव-विसापूर रस्त्यावर कॅनॉलजवळ बँक कर्मचाऱ्यांना अडवले. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची टीम तासगावात दाखल झाली आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.