कुणाल जमदाडे, झी मीडिया, संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळवाडी परीसरातील वांजरकडा या छोट्याशा तलावात आंघोळीसाठी आणि खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या चार चिमुकल्यां भावडांचा वीजेचा शॉक लागून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास घडलीय.या घटनेने पठार भागासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत अनिकेत अरूण बर्डे (वय 12), ओंकार अरूण बर्डे (वय 10), दर्शन अजित बर्डे (वय 8) आणि विराज अजित बर्डे (वय 6), या चौघा भावडांचा मृत्यू झाला.
आज दुपारी चारही भावंडे आंघोळीसाठी तसंच खेकडे पकडण्यासाठी खंदरळमाळवाडी परिसरातील वांजरकडा इथं असणाऱ्या छोट्या तलावात गेले होते. दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळामुळे तलावा शेजारून जाणाऱ्या उच्च दाबाच्या प्रवाहाची तार तुटून त्याचा वीज प्रवाह या तलावात उतरला होता. याची कल्पना त्यांना न आल्याने चारही भांवडं आंघोळीसाठी तलावात उतरली. आणि त्यांना वीजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे एकमेकांना वाचविण्यात चौघांचाही जीव गेला.
याबाबतची माहिती आजूबाजुच्या नागरीकांना समजली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरीकांनी चारही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. याबाबतची माहिती घारगाव पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
व्यवस्थीत रस्ता नसल्याने या चौघांचेही मृातदेह झोळी करून गावात आणण्यात आले आणि तेथून रूग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर कॉटेज रूग्णालयात पाठविण्यात आले. अनिकेत आणि ओंकार हे दोघे सख्खे भाऊ तर दर्शन आणि विराज हे दोघे सख्खे भाऊ आशा दोन कुटूंबातील चार भावडांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर
दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळामुळे तलावा शेजारून जाणाऱ्या उच्च दाबाच्या प्रवाहाची तार तुटून त्याचा वीज प्रवाह या तलावात उतरला होता. तारा तुटून त्या जमिनीवर आणि तलावात पडल्यानंतरही त्यातला वीज प्रवाह महावितरण अधिकाऱ्यांनी बंद का केला नव्हता. महावितरण विभागाचे तुटलेल्या तारण कडे लक्ष नव्हते का..? असे सवाल आता उपस्थित होतायत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही दुर्देवी घटना घडल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.