सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण

यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत.

Updated: Aug 12, 2018, 12:10 PM IST
सनातन संस्थेवर बंदी घाला- अशोक चव्हाण title=

मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापे टाकून सनातन संस्थेच्या साधकांना शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

'एएनआय' वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, एटीएसने टाकलेल्या छाप्यांमध्ये २० बॉम्ब आणि स्फोटकांसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरण आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन हिंदुत्ववादी अतेरिक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही स्फोटके आणि ती तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली होती. 

त्यानंतर या तरुणांच्या चौकशीदरम्यान सुधन्वा गोंधळेकर याने आणखी शस्त्रसाठा लपवल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, एटीएसने पुन्हा विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात आणखी शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. यामध्ये गावठी कट्टे, वाहनांच्या नंबर प्लेट्स, चॉपर आणि स्टीलचे चाकू अशा हत्यारांचा समावेश आहे.