सचिन वाझेंना वसुली अधिकारी म्हणून पदावर बसवलं, फडणवीसांची घणाघाती टीका

मी सीएम असताना वाझेंना परत घेण्याचा शिवसेनेकडून दबाव होता.- फडणवीस

Updated: Mar 17, 2021, 06:35 PM IST
सचिन वाझेंना वसुली अधिकारी म्हणून पदावर बसवलं, फडणवीसांची घणाघाती टीका title=

नवी दिल्ली : विरोधीपक्षे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि शिवेसेनेवर जोरदार टीका केली आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन त्यांनी अनेक गंभीर आरोप सरकारवर केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत ही फडणवीस यांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

फडणवीस यांनी म्हटलं की, मनसुख हिरन यांची हत्या केली गेली.  अशा सर्व घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाल्या नाही. ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरण याचा अनुभव घेतला होता. रक्षा करणारेच गुन्हेगार बनले तर सुरक्षा कोण करणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

'एपीआय सचीन वाझे यांना परत पोलीस सेवेत का घेतले?. मी सीएम असताना वाझेंना परत घेण्याचा शिवसेनेकडून दबाव होता. मी ज्येष्ठ वकीलांचा सल्ला घेतला. वाझेवर हायकोर्टानं कारवाई केल्यानं त्यांना घेण्यास मनाई केली गेली. सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यातून बिझनेस रिलेशन तयार झाले. नंतर महाविकासआघाडी आल्यानंतर सचिन वाझेला घेतले गेले. कोरोनाचे कारण सांगून सचिन वाझेंना सेवेत घेतले. पण इतर अधिका-यांना सेवेत घेतले नाही.'

'सचिन वाझेवर खंडणीची केस चाललीय. वसई प्रकरणात खंडणी केस होती. वाझेचा खराब रेकार्ड असतानाही वाझेला घेतले. क्राईम इंटेलिजन्स युनिट मध्ये सचिन वाझेला घेतले. हे पोलीस निरीक्षकाचं पद आहे परंतु एपीआयला घेतले. कोणतीही केस सीआययू कडे येते. आयुक्तानंतर सचिन वाझेंचे पद मोठे होते. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद, शिवसेना मंत्र्यांसोबत वाझे दिसत होते. वाझे वसूली अधिका-याच्या रूपाने बसवले. असं देखील फडणवीसांनी म्हटलं.

'मनसुख हिरनला वाझे इंटरोगेट करत होते. हिरन यांची गाडी हरवली अशी तक्रार घ्यायला वाझेंनी पोलिसांना फोन केला. मनसुख हिरनची हत्या करून मृतदेह हाय टाईड मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु हाय टाईड ऐवजी लो टाईड आली. म्हणून मनसुख हिरनचा मृतदेह पाण्यात गेला नाही. बाहेरच राहीला. मनसुख हिरेनची केस एटीएसकडे आहे. एटीएस कारवाई करताना दिसत नाही, काय कारण आहे? पोलिसांकडे जास्त पुरावे आहेत. एटीएसकडे टेप आहेत त्यात मनसुख आणि वाझेचे आवाज आहेत. हेच पुरावे आहेत.'

'एटीएस वर दबाव आहे का? मनसुख हत्या प्रकरण एनआयए कडे जायला पाहीजे. मनसुखची घटना एकटे वाझे करू शकत नाही. यात अनेकांचा हात आहे. पोलिसांचे अपयश नाही तर सरकारचे आहे. मुख्यमंत्री एका पोलिसाला वाचवत आहेत. सचिन वाझेला महात्मा ठरवलं जातंय का असं वाटत होतं.' अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे.